कोल्‍हापूर : बोरवडे शिवारात दगडी मूर्तींची अघोरी पूजा; अज्ञाताकडून प्रकार, गावात भीतीचे वातावरण | पुढारी

कोल्‍हापूर : बोरवडे शिवारात दगडी मूर्तींची अघोरी पूजा; अज्ञाताकडून प्रकार, गावात भीतीचे वातावरण

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील बोरवडे गावच्या दक्षिणेला पठार नावाच्या शिवारात अज्ञात व्यक्तींनी 7 ते 8 दगडी मूर्त्या रंगवून उभ्या केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले आहे. या मूर्त्यांना भगवे फेटे व साड्या नेसवून त्यांना हार घालून पूजा करण्यात आली आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याची गावात चर्चा असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे देशाची विज्ञान व तंत्रज्ञानात भरारी होत असताना अंधश्रद्धेतून भानामती, काळी जादू याचा पगडा अजूनही काही लोकांवर असल्याचे दिसून येत आहे.

बोरवडे येथील शिवारात चार ते पाच दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी या मूर्तीचे पूजन केलेले ग्रामस्थांना आढळून आले. या मूर्तींना शेंदूराने रंगवून भगवे फेटे नेसविण्यात आले आहेत. गावाकडे तोंड करून या दगडी मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या पाठीमागे भगवा झेंडा रोवला आहे. मूर्तींची पूजा-अर्चा केलेले साहित्य जवळच विखुरले आहे. हा भानामतीचा प्रकार असून, त्या रात्री ढोल वाजल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. शेताकडे गवत कापण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. गावावर रोगराईचे संकट येईल, अशी भीती निर्माण झाली आहे. शेतकरीवर्ग शेती कामासाठी जाण्यास भीती व्यक्त करीत आहेत.

Back to top button