पिंपरी : दिवाळीचा मुहूर्त साधत घरांसाठी आवश्यक बुकिंगसाठी नागरिकांचा कल वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक 15 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे, या क्षेत्रात सध्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि. 10) ग्राहकांचा घर बुकिंग करण्यासाठी प्रतिसाद होता. प्रामुख्याने खासगी कंपनीतील नोकरदार, सरकारी कर्मचारी व व्यावसायिक हे यामध्ये आघाडीवर होते. रियल इस्टेटमध्ये व प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक ही भविष्यात फायद्याची ठरत असल्यामुळे दिवसेंदिवस यामध्ये गुंतवणूक वाढत आहे.
आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यामुळे सोयिस्कर जागा, आवश्यक सोयीसुविधा आणि बजेट आदी गोष्टींचा विचार करुन घर खरेदी केली जाते. नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राच्या जारी केलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात 14 हजार 983 घरांची विक्री झाली. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात 11 हजार 842 घरांची विक्री झाली होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विकसित होत असलेली मेट्रो, पीएमआरडीए आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून साकारणारा रिंगरोड, पुरंदर विमानतळाच्या दृष्टीने सुरू असलेल्या हालचाली, दळणवळणासाठी आवश्यक असलेले रस्ते आणि उड्डाण पुलांचा विकास अशा विविध सुविधांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात फ्लॅट खरेदी करण्याकडे अनेकांचा कल पाहण्यास मिळत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे शहर अंतर्गत बाणेर, बालेवाडी तर, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड, पुनावळे, रावेत आदी परिसरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे, अशी माहिती क्रेडाईचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.
दसर्याच्या कालावधीत घर खरेदीसाठी पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणि त्यानंतरही चांगले बुकिंग होण्याची अपेक्षा आहे.
– राजेंद्र लुंकड,
बांधकाम व्यावसायिक.बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती, बांधकामाचे वाढलेले दर याचा परिणाम फ्लॅट विक्रीवर झालेला नाही. बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅटच्या किमती नियंत्रणात ठेवल्या आहेत. पर्यायाने, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात फ्लॅट खरेदीसाठी पुणे परिसराबाहेरील नागरिकदेखील पसंती देत आहेत.
– शांतीलाल कटारिया,
माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, क्रेडाई.
हेही वाचा