शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन | पुढारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन

पुणे, पुढारी वृत्तसेवा :

आपल्या आयुष्यातील 60 वर्षाहून अधिक काळ शिवकार्यासाठी बहाल करणाऱ्या पद्मविभुषण आणि महाराष्ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले.  दुपारी 1 च्या सुमारास विधी पुर्ण करून शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.

त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी कुटूंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवशाहीर बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली. शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी, स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीष बापट, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सहायक संचालक सुनीता आसवले यांनीही स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

तसेच, खासदार अरविंद सावंत, पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता वाडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपूत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.

स्वर्गीय पुरंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

हे ही वाचा :

Back to top button