Pune News : जुन्नरला कापसाच्या पिकाला पसंती | पुढारी

Pune News : जुन्नरला कापसाच्या पिकाला पसंती

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा व विदर्भात ‘पांढर सोनं’ म्हणून ओळख असलेल्या कापूस पिकास आता जुन्नर तालुक्यातही पसंती वाढली आहे. चांगला बाजारभाव, विक्रीसाठी जवळच बाजारपेठ उपलब्ध असल्याने तालुक्यातील साकोरी, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव भागात तरकारी पिकांना पर्याय म्हणून कापसाची लागवड करू लागले आहेत. सध्या कापसाला प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांचा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

कापसासाठी तालुक्याच्या पूर्वभागातील वातावरण हे अनुकूल असल्याचे शेतकरी सांगत आहेत. इतर पिकांपेक्षा कापसाला कमी मशागत व कीटकनाशके कमी फवारावी लागत आहेत. तरकारी पिकांना शेतकर्‍यांना खूप मेहनत करावी लागते. तर, अनेकदा तरकारी पिकाला कमी बाजारभाव मिळतो. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे साकोरी, मंगरूळ या गावांमधील अनेक शेतकर्‍यांकडून कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. साकोरी येथे दोन कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. बोरी गावातील काही शेतकरी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कापसाचे पीक घेत आहेत.

सध्या कापसाची वेचणी चालू झालेली आहे. तर, सध्या कापसाला प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. मात्र, चालू वर्षी कापूस फुलोर्‍यात आलेला असताना पावसाने दांडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची गळती झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कापूस काढल्यानंतर शेतात दुसरे पीकही घेता येते. कापसाचे पीक निघाल्यानंतर जमिनीचा पोत सुधरतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या भागातील शेतकर्‍यांचा कल कापसाकडे अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

Back to top button