

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेंगलोरमधून जेरबंद करत त्याचा नाशिकमधील अमली पदार्थांचा कारखाना उद्धस्त केल्यानंतर आता राज्यातील बंद पडलेले, भाडेतत्वावर दिलेले आणि ड्रग्ज निर्मिती करणारे कारखाने पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलिसांकडून स्थानिक पातळीवर अशा सर्व कारखान्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
स्थानिक पोलिसांव्यतिरीक्त अन्य कोणत्याही यंत्रणेने अशा प्रकारे अवैध ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, राज्यात लवकरच अॅन्टी नार्कोटीक्स टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असून विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी या पथकाचा प्रमुख असणार असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि राज्य पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी दिली.
अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांसह जिल्हा पातळीवर सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य यंत्रणेला एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे कारखाने आढळल्यास स्थानिक प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत. राज्यात सध्या नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर येथील कारखान्यांवर कारवाई झाल्यामुळे येथील तीन अधिकाच्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची नियंत्रण कक्षांमध्ये बदली करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितले.