Pune : महानंदमार्फत अतिरिक्त दूध खरेदी योजना राबवा | पुढारी

Pune : महानंदमार्फत अतिरिक्त दूध खरेदी योजना राबवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सहकारी दूध संघांकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला असून या दुधाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागील योजनेप्रमाणेच दूध महासंघामार्फत (महानंद) अतिरिक्त दुधाची शासन दराप्रमाणे खरेदी करुन त्याचे दूध भुकटी तयार करण्याची मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी शासनाकडे केलेली आहे.

कल्याणकारी संघाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दुग्ध व्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांना या बाबत बुधवारी (दि.8) निवेदन पाठवून अतिरिक्त दुधापासून पावडर व बटर तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच दुधास प्रति लिटरला तीन रुपयांप्रमाणे अनुदान दयावे. अन्यथः दूध खरेदी दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन दूध उत्पादक शेतकर्‍यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली आहे.

राज्यात दूध पावडर आणि बटरचे साठे पडून असून जागतिक बाजारपेठेतही पावडर व बटरचे दर घसरल्याने स्थानिक बाजारात गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रति लिटरला 34 रुपयांवरुन घटून 28 ते 29 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यातून सहकारी दूध संघाकडे अधिक दरामुळे दूधाची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे सहकारी संघाकडे अतिरिक्त दूध होत आहे. या बाबत म्हस्के म्हणाले, शासनाने दूध खरेदी योजना राबविण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्यास पावडर उत्पादक व्यावसायिकांना कोटा ठरवून देवून त्या दुधास प्रति लिटरला तीन रुपयांप्रमाणे अनुदान दयावे. मात्र, ही योजना राबविताना मागील वेळेप्रमाणे अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. सर्वत्र एकाच वेळी योजना सुरु करावी. अनुदानाची रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिली जाईल. त्यामुळे शासनाने याविषयी तातडीने पावले उचलावीत.

हेही वाचा :

Back to top button