संतापजनक ! पेट्रोल पंपासाठी दिला शंभर वर्षं जुन्या झाडांचा बळी | पुढारी

संतापजनक ! पेट्रोल पंपासाठी दिला शंभर वर्षं जुन्या झाडांचा बळी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील वाडारोडवर सातकरस्थळ परिसरात रस्त्याच्या दुतर्फा तब्बल शंभर-दीडशे वर्षांची भव्य अशा वडाच्या वृक्षांची केवळ एका पेट्रोल पंपासाठी एका रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. कोणत्याही खासगी व्यक्तीला वृक्ष तोडीची परवानगी मिळत नसल्याने या व्यक्तीच्या मदतीला सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग धावून आले, परवानगी दिली आणि एका रात्रीत तब्बल दीडशे वर्षे जुन्या वृक्षतोडीसाठी प्रचंड तत्परता दाखवत मदतही केली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

खेड तालुक्यातील वाडा रोड येथे सातकरस्थळ परिसरात रस्याच्या दुतर्फा शंभर दीडशे वर्षे जुनी वडाचे अनेक वृक्ष दिमाखात उभे आहेत. रस्यालगतची जुनी-मोठी वृक्ष नामशेष होताना दिसत असताना गावातील सतर्क नागरिक व ग्रामपंचायतीचे लक्ष असल्याने सातकरस्थळ येथील ही वडाची झाडे आजही टिकून आहेत. परंतु या रस्यावर पेट्रोल पंपाचे काम सुरू असून, पेट्रोल पंपाचा दर्शनी भाग बाधित होऊ नये, जाणा-या येणा-या लोकांसाठी पेट्रोल पंप सहज निदर्शनास यावा म्हणून शासनाच्या सर्वच यंत्रणांनी प्रचंड तत्परता दाखवत या खासगी व्यक्तीच्या मदतीला धावून आली. खासगी व्यक्तीला ऐवढे जुने वृक्ष तोडायची परवानगी मिळणार नाही म्हणून सरकारी यंत्रणेने ही जोखीम देखील आपल्या खांद्यावर घेत एका रात्रीत परवानगी देऊन शंभर वर्षे जुन्या वडाच्या झाडांची कत्तल केली.

वाडा रोडवर पेट्रोल पंपासाठी एक-दोन झाडे तोडण्याची परवानगी द्यावी असे पत्र आमच्या विभागाला दिले. परंतु वृक्ष तोडीची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग देत नसून, वन विभाग देतो, असे आम्ही संबंधित व्यक्तीला कळवले. तसेच या व्यक्तीला परवानगी द्यावी असेही आम्ही लेखी वनविभागाला कळवले.
                – एस.डी.मुरकुटे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड

सार्वजनिक बांधकाम विभागाने वाडा रोड वरील वृक्ष तोडीसाठी परवानगी मागीतली होती. सार्वजनिक कामासाठी ही परवानगी मागितली असल्याने आम्ही सरकारी यंत्रणेला ही परवानगी दिली. खासगी व्यक्तीला परवानगी दिली नाही.
                                                 – प्रदीप रौधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, खेड

Back to top button