Pune : पाच हजारांची लाच घेताना दिवे येथे तलाठ्याला पकडले

file photo
file photo

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  दिवे (ता. पुरंदर) येथे उदाचीवाडीमधील बक्षीसपत्राची नोंद सातबारा उतार्‍यावर करण्यासाठी तलाठी व खासगी व्यक्ती यांना पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, याबाबत सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (दि. 7) रात्री ही कारवाई करण्यात आली. एकाच वेळी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. तलाठी नीलेश सुभाष गद्रे (रा. एफ 106, नमोविहार, सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे) व खासगी व्यक्ती आदित्य मधुकर कुंभारकर (रा. वनपुरी, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत नीलेश परसराम खेडेकर (रा. गुर्‍होळी, ता. पुरंदर) यांनी फिर्यादी दिली.

फिर्यादीची आई संगीता खेडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आईचे वडील बबन शंकर कुंभारकर यांच्या मालकीची उदाचीवाडी येथे गट क्र. 252 मधील 39 गुंठे क्षेत्र त्यांच्या स्वखुशीने बक्षीसपत्राने 15 दिवसांपूर्वी फिर्यादीच्या नावावर केले आहे. या क्षेत्राची नोंद फिर्यादीच्या नावे करून देण्यासाठी ते उदाचीवाडी-वनपुरी येथील तलाठी नीलेश गद्रे यांना भेटले असता त्यांनी या नोंदीकरिता पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. परंतु, फिर्यादीकडे त्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली.

याप्रकरणी लोकसेवक तलाठी गद्रे यांच्याकडे पडताळणीसाठी फिर्यादीकडे व्हॉईस रेकॉर्डर देऊन शासकीय पंच मुंडे यांच्यासह तहसील कार्यालय पुरंदर सासवड येथील तलाठी कार्यालयात पाठविले असता, त्या ठिकाणी तलाठी गद्रे नसल्याने फिर्यादीने त्यांच्या मोबाईलवरून फोन केला. त्यांनी दिवे येथील तलाठी कार्यालयात बोलावले. या ठिकाणी जाऊन फिर्यादीने तलाठी गद्रे यांची भेट घेतली, त्यांचे कार्यालयातील खासगी व्यक्ती आदित्य कुंभारकर यास भेटण्यास सांगितले. पण, संपर्क होऊ शकला नाही. परत गद्रे यांना फोन केला असता त्यांनी फिर्यादीला हॉटेल चूल मटण येथे येण्यास सांगितले. फिर्यादीने गद्रे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत असलेल्या खासगी व्यक्ती आदित्य भारकर याच्याकडे पाच हजार देण्यास सांगितले. आदित्य याने पाच हजार घेतल्यानंतर फिर्यादीने सापळा पथक यांना इशारा केल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व सापळा पथक यांनी त्या ठिकाणी येऊन तलाठी गद्रे व खासगी व्यक्ती आदित्य यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news