पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'आज महाराष्ट्रात अन् देशात काय चाललं आहे, हे पाहवत नाही. एकमेकांचे हाडवैरी असल्यागत आजचे राजकारणी वागताना पाहिल्यावर वाईट वाटतं. इंग्रजांचं राज्य गेलं. आता आपलं सरकार आलं. पण, त्यात शाहू महाराजांसारखी माया नाही हो…' छत्रपती शाहू महाराजांना पाहिलेल्या पांडूमामांचे हे उद्गार सांगताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे डोळे पाणावले, तेव्हा गर्दीने खचाखच भरलेले सभागृह देखील हळवे झाले.
दिवंगत शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबा आढाव यांना 'कृतज्ञता' पुरस्कार देण्यात आला. या वेळी 93 वर्षांच्या ज्येष्ठ समाजसेवकाने सभागृहाला जुन्या आठवणींत नेत सर्वांना प्रेरणादायी विचारांची शिदोरीच दिली. बाबा देशातील अन् राज्यातील परिस्थितीवर बोलताना खूप भावुक झाले होते. ते अत्यंत पोटतिडकीने बोलले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी राज्य व केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.
बाबा म्हणाले की, आज फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आपण विसरत आहोत. महात्मा फुले यांनी 'सत्यमेव जयते' ही घोषणा सर्वप्रथम दिली. त्यांनी केलेली समाजहिताची प्रार्थना सर्व विसरले. अगदी पुणे विद्यापीठातही ती म्हटली जात नाही, ही शोकांतिका आहे. आज तरुणांना नोकर्या मिळत नाहीत, याला सरकारचे धोरण जबाबदार आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थितीवर त्यांनी कुणाचेही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, आम्हीही आंदोलने केली. सध्या करीत आहोत. पण, इतकी पराकोटीची द्वेषभावना एकमेकांत पाहिली नाही. ती आजच्या राजकारणात दिसते आहे. राज्यात जे काही सध्या सुरू आहे, त्यावर तोडगा निघू शकतो. फक्त घटनेत बदल करण्याची गरज आहे. पण, राजकारणी तात्पुरता विचार करीत असल्याने मार्ग निघत नाही. नेपाळने एकमेव हिंदुराष्ट्र हे बिरुद सोडले. ते आता लोकशाही मानू लागले. पण, आपण विज्ञाननिष्ठ असूनही सनातनी विचारांकडे जात आहोत, हे धोकादायक आहे. पाकिस्तानची धूळधाण का झाली? याचा विचार केला पाहिजे. त्याच दिशेने आपण जात नाही ना? माणसे इकडून तिकडे पळवताहेत. अहो, डाकू परवडले अशी अवस्था आहे. घटना कशाला केली मग?
बाबा सुमारे तासभर बोलत होते. सभागृहात प्रचंड शांतता होती. श्रोते जिवाचे कान करून त्यांचे विचार ऐकत होते. बाबांनी एक आठवण सांगितली. म्हणाले, अहो मी 1972 साली कोल्हापूरला गेलो. तेव्हा शाहू महाराजांना पाहिलेला माणूस पाहायचा होता. खूप शोधल्यावर पांडूमामा नावाचा माणूस भेटला. तो खूप म्हातारा झाला होता. खांद्यावर घोंगडी होती. ती खाली अंथरली. मला त्यावर बसविले. मी म्हणालो, तुम्ही शाहू महाराजांना पाहिलंय? आता इंग्रजांची सत्ता गेली. आपलं सरकार आलं, कसं वाटतं? त्यावर पांडूमामा हळव्या सुरात म्हणाले, 'सरकार आपलंच आहे. पण, त्यात शाहू महाराजांसारखी माया नाही हो..!'
हेही वाचा