आजच माहिती द्या, उद्या पुराव्यानिशी जाहीर करतो; शेट्टी यांचे मुश्रीफ यांना प्रत्युत्तर | पुढारी

आजच माहिती द्या, उद्या पुराव्यानिशी जाहीर करतो; शेट्टी यांचे मुश्रीफ यांना प्रत्युत्तर

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानीने तुटलेल्या उसाला 400 रुपये मागणी केली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी हे पैसे बुडविण्यासाठी गट्टी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दोनवेळा बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्यातील कारखान्याच्या अध्यक्षांनी पाठ फिरवली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मला जिल्ह्यातील मोजक्या कारखान्यांची माहिती दिल्यानंतर मी त्यामधून कशा पद्धतीने 400 रुपये देता येतात याबाबत खुलासा केला आहे. उर्वरित कारखान्यांची माहिती आजच द्यावी, उद्या या सर्व कारखान्यांना कसा दर देता येतो, याबाबत मी पुराव्यानिशी जाहीर करतो, असे प्रत्युत्तर राजू शेट्टी यांनी दिले. जयसिंगपूर येथे ऊस परिषदेच्या स्टेजवर शेट्टी यांनी मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले, मुश्रीफ यांनी साखर विकण्याचे दिलेले आव्हान मी स्वीकारतो. यापेक्षा सर्व कारखान्यांनी दरमहा साखर कशी दराने व कोणाला विकली याचा खुलासा करावा. सहकारी साखर कारखाने उभारणी केल्यापासून तोट्यात आहेत मात्र याच लोकांचे खासगी कारखाने नफ्यात आहेत.

गाळप हंगाम कमी झाल्याने कारखाने तोट्यात जात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांचे म्हणणे बरोबर आहे. पण यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व संघटना जबाबदार नसून साखर कारखानदारांनीच हव्यासापोटी गाळप क्षमता वाढविल्याने त्याचे परिणाम आता कारखान्यांना भोगावे लागत आहेत. वारेमाफ खर्च करून विविध प्रकल्प उभे केले जात आहेत. कारखान्याच्या खरेदी दरात मोठा ढपला मारला जात आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार व कारखानदार मिळून शेतकर्‍यांंचा बळी घेणार असाल तर रस्त्यावरची लढाई आक्रमक करावे लागेल. असा इशारा शेट्टी यांनी दिला.

एवढा पैसा अचानक आला कुठून

कर्नाटक मधील साखर कारखानदारांनी एकजुट करत हंगामाच्या सुरूवातीस 2900 रूपये दर देण्याचा निर्णय घेतला. याप्रमाणे सर्वांनी 2900 रूपये दर जाहीरही केला. उसाची कमतरता आहे हे लक्षात आल्यानंतर या कारखान्यातील एकजुटीची वज—मुठ चारच दिवसात सुटली. एफआरपी पेक्षा हे कारखाने 300 रूपयापेक्षा जास्त पैसे देत असतील तर मग यांच्याकडून एवढा पैसा अचानक आला कुठून याचे उत्तर द्यावे असे शेट्टी यांनी सांगितले.

चर्चेसाठी दरवाजे खुली

कारखानदार 400 देण्याच्या मनस्थित नाहीत. त्यामुळे 400 दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही ऊस तोडी बंद केल्या आहेत. आज आम्हाला निसर्गानेही साथ देवून 8 ते 10 दिवस शेत वाळणार नाही असा मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे 400 रुपयासाठी जोपर्यत् दरवाजे खुली आहेत तो पर्यत चर्चेला या अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव— करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Back to top button