कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिणायन कालखंडातील अंबाबाईच्या किरणोत्सवाला गुरुवारपासून (दि. 9) सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण असूनही किरणे गर्भगृहाबाहेरील पायर्यांपर्यंत पोहोचली. गुरुवारी किरणोत्सवाचा पहिला दिवस असून किरणे देवीच्या चरणांपर्यंत येण्याची शक्यता आहे.
अंबाबाईचा किरणोत्सव 9 ते 13 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यातील 9, 10 आणि 11 नोव्हेंबर हे मुख्य दिवस असणार आहेत. पहिल्या दिवशी देवीच्या चरणावर, दुसर्या दिवशी शरीरावर, तिसर्या दिवशी मुखकमलावर पडतात. सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हा सोहळा भाविकांना पाहता यावा, यासाठी विद्यापीठ हायस्कूल परिसर, बिंदू चौक व मंदिरातील एलईडी स्क्रिनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.