Grampanchayat Result : मुळशीत तरुणाईकडून दिग्गजांना धोबीपछाड | पुढारी

Grampanchayat Result : मुळशीत तरुणाईकडून दिग्गजांना धोबीपछाड

पौड : पुढारी वृत्तसेवा :  मुळशी तालुक्यात झालेल्या 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी तरुणाईच्या हाती गावच्या सत्तेच्या चाव्या दिल्या. काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत नवोदितांना संधी मिळाली. तथापि, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेसने ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा केला आहे. पौड येथील सेनापती बापट सभागृहात झालेली मतमोजणी तहसीलदार रणजित भोसले, अप्पर तहसीलदार प्रियंका मिसाळ, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडली.

भांबर्डे, डावजे, जातेडे, वातुंडे या 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संभवे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी अर्जच न आल्याने हे पद रिक्त राहिले, तर उर्वरित 18 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि काही सदस्यांच्या निवडीसाठी रविवारी (दि. 5) निवडणूक झाली. पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (दि. 6) एकूण 6 फेर्‍यांत मतमोजणी झाली. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोंढावळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक अमित कंधारे यांच्या पत्नी पल्लवी कंधारे यांनी 400 मतांच्या फरकाने सुरेखा कंधारे आणि रंजना कंधारे यांचा पराभव केला. जामगावमध्ये विनोद सुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी किरण ठोंबरे, माजी सरपंच हनुमंत सुर्वे, शंकर बांदल यांना पराभूत केले. माले ग्रामपंचायतीत पत्नीनंतर पती, तर आंबवणे ग्रामपंचायतीत पतीनंतर पत्नीच्या हातात ग्रामस्थांनी सत्तेच्या चाव्या दिल्या. माले येथे सुहास शेंडे तर आंबवण्यात सीता कराळे विजयी झाल्या. यापूर्वी माले ग्रामपंचायतीत सुहास यांच्या पत्नी सोनल, तर आंबवणेमध्ये सीता यांचे पती मच्छिंद्र कराळे हे गावकारभारी होते.

वळणे ग्रामपंचायतीत रोहिणी राजेंद्र सोंडकर यांनी अंजना जयवंत सातपुते यांच्यावर मात करीत विजयश्री खेचून आणली. वांद्रे ग्रामपंचायतीत माजी आमदार शरद ढमाले यांचा पुतण्या अनिकेत यांना पराभवाचा धक्का बसला. वाघवाडीत प्रस्थापितांना धक्का देत प्रकाश वाघ हे विजयी झाले. मुळशी खुर्दमध्ये सुनील पासलकर यांनी प्रज्वल कानगुडे आणि संतोष कानगुडे यांना पराभूत केले, तर वारकमध्ये संतोष भिलारे यांनी सुजाता मराठे यांना पराभूत केले.

शेडाणी ग्रामपंचायतीत वर्षा राऊत यांनी रूपाली ढोकळे आणि माया खिलारे यांच्यावर मात केली. बेलवड्यात सुजाता ढमाले यांनी छाया येनपुरे यांना पराभूत केले. खुबवलीत वैष्णवी पवार विजयी झाल्या. भादसमध्ये जयकिसन जाधव यांनी सख्ख्या भाऊ-बहिणींचा पराभव केला. धामणओहोळला वंदना शेडगे, मूगावला संगीता मरगळे, टेमघरला सचिन मरगळे तर वेगरे येथे राजश्री मरगळे, तर ताम्हिणीत स्वाती चोरघे हे विजयी झाले. पौड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत किरण आगनेन यांनी संतोष पारखी यांचा, तर कासारआंबोलीत ओंकार गायकवाड यांनी महेश मानकर यांचा पराभव केला.

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदी विजय
ताम्हिणी येथे स्वाती चोरघे, तर खुबवली येथे वैष्णवी पवार या दोघी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, अशा दोन ठिकाणी विजयी झालेल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button