Pune News : दिवाळीआधीच प्रदूषणाची दिवाळी ; वापरा एन-95 मास्क | पुढारी

Pune News : दिवाळीआधीच प्रदूषणाची दिवाळी ; वापरा एन-95 मास्क

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीपूर्वीच यंदा नागरिकांना वायुप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावत आहेत. वायुप्रदूषणामुळे खोकला, घशातील खवखव, श्वास घेण्यास त्रास, असे त्रास सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना एन-95 मास्कचा वापर करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत. राज्यातील हवेची गुणवत्ता सध्या खूप खराब झाली आहे. अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे.

वायू गुणवत्ता निर्देशांकाने 200 हून अधिक एवढी धोकादायक पातळी गाठल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे श्वसनाचे त्रास टाळण्यासाठी एन-95 मास्क किंवा एन-99 मास्क वापरण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिल्या आहेत. डॉ. सारणीकर यांनी राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्रदूषणाबाबत उपाययोजना सुचविल्या आहेत.

उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी रुमाल, स्कार्फ उपयुक्त ठरत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एअर प्युरिफायर वापरतानाही त्याच्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करा, त्याचे फिल्टर वारंवार बदला किंवा स्वच्छ करा, ओझोन निर्माण करणारे एअर प्युरिफायर वापरणे टाळावे; कारण यामुळे खोल्यांमधील प्रदूषण वाढते. घरी आणि वाहनात एअर कंडिशनचा वापर करताना बाहेरील हवेशी संपर्क टाळण्यासाठी तो रिसर्क्युलेट मोडमध्ये वापरा, असेही सूचनांमध्ये म्हटले आहे.

  • आरोग्य विभागाच्या नागरिकांना सूचना
  • अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले
  • श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी रुमाल, स्कार्फ उपयोगाचा नाही

कोणी घ्यावी काळजी?

  • पाच वर्षांखालील मुले व वृद्धापकाळातील व्यक्ती
  • गर्भवती महिला
  • दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती
  • वाहतूक पोलिस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार, रिक्षाचालक, रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते आणि प्रदूषित वातावरणात घराबाहेर काम करणारे लोक.

हेही वाचा

‘सीपीआर’ने मागविले पिण्याचे पाणी विकत

फुटबॉल हंगाम : संघ, खेळाडू नोंदणी प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून

Pune News : प्रदूषणामुळे वाढतोय फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका

Back to top button