Pune News : प्रदूषणामुळे वाढतोय फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका | पुढारी

Pune News : प्रदूषणामुळे वाढतोय फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन’ या संस्थेच्या पाहणीनुसार, येत्या पाच वर्षांमध्ये भारतात फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णसंख्येत 12 टक्के वाढ होईल, असा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

प्रदूषणाचे वाढते प्रमाण, बदलती जीवनशैली, व्यसनाधीनता अशा अनेक कारणांमुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. धूम—पान न करणार्‍या लोकांमध्येही प्रदूषणामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवेतील सल्फर, नायट्रोजन असे विविध वायू फुप्फुसांच्या कार्यक्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असे मत डॉ. वैभव पांढरकर यांनी व्यक्त केले आहे.

जनरल फिजिशियन डॉ. प्रणीता साबळे म्हणाल्या, ‘प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी सण साजरे करतानाही विचारपूर्वक वागले पाहिजे आणि पर्यावरणाबद्दल, आरोग्याबद्दल सजग असले पाहिजे. पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यासाठी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी फटाके वाजविणे टाळा. त्याऐवजी फुगे, कागदी फटाके आणि इतर पर्यावरणस्नेही पर्याय वापरा. सजावटीसाठी फुले आणि ऑर्गेनिक रंग वापरा. मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगा.’

कोणती तपासणी करावी?

बायोप्सी : या तपासणीमध्ये फुप्फुसातील उतीचा एक तुकडा किंवा द्रव नमुन्यादाखल घेतला जातो. कर्कग्रस्त पेशींची शक्यता तपासण्यासाठी हा नमुना सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो.
इमेज टेस्ट : एक्स-रे किंवा सीटी स्कॅनमुळे एखाद्या
ठिकाणी अनैसर्गिक वजन किंवा गाठ जाणवत असल्यास तिचे निदान होऊ शकते.
एंडोब—ाँकियल अल्ट्रासाउंड : या पद्धतीमुळे कॅन्सरसह फुप्फुसाच्या विविध आजारांचे निदान होऊ शकते.

प्रदूषणाचा थेट परिणाम फुप्फुसांवर होतो. गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. जमिनीचे जास्त खोलवर खनन केल्यास बाहेर पडणार्‍या युरेनियममधून रेडॉन तयार होतात आणि फुप्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. याबाबत जागरूकता वाढायला हवी. हरित जीवनशैलीकडे आपण वळले पाहिजे; अन्यथा आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीलाच परिणाम भोगावे लागणार आहेत.

डॉ. मिनीष जैन, ऑनकॉलॉजिस्ट

हेही वाचा

भोगावती निवडणूक : शेकाप, जनता दल सत्ताधारी आघाडीसोबत

Pune News : खोदाई प्रचंड, प्रदूषण उदंड!

Pune News : आत दाम्पत्याचे समुपदेशन; बाहेर विहिणींमध्ये हाणामारी

Back to top button