फुटबॉल हंगाम : संघ, खेळाडू नोंदणी प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून

फुटबॉल हंगाम : संघ, खेळाडू नोंदणी प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या (सन 2023-24) फुटबॉल हंगामासाठी खेळाडू व संघ नोंदणी प्रक्रिया दि. 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दि. 23 नोव्हेंबरपर्यंत वरिष्ठ गटातील नोंदणी प्रक्रिया सुरू राहाणार आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंना बंदीसह सर्व नियमांना फुटबॉल संघांनी मान्यता दिली. सोमवारी सायंकाळी छत्रपती शाहू स्टेडियमवर आगामी फुटबॉल हंगामाची नियोजन बैठक झाली.

केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज व अध्यक्ष मालोजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हंगामाची तयारी सुरू असल्याची माहिती सचिव माणिक मंडलिक यांनी प्रास्ताविकात दिली. बैठकीस अमर सासने, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, विश्वंभर मालेकर, संभाजीराव मांगोरे-पाटील, दीपक घोडके, प्रदीप साळोखे, मनोज जाधव यांच्यासह वरिष्ठ गटातील 16 संघांचे पदाधिकारी-प्रशिक्षक उपस्थित होते. राजेंद्र दळवी यांनी संघ व खेळाडू नोंदणी याबाबतच्या नियमावलीचे वाचन केले. याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

नियमित खेळाडू नोंदणी 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत

दरम्यान, वरिष्ठ गटातील संघ व खेळाडू नोंदणी प्रक्रिया दि.16 व 17 नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. नियमित खेळाडू नोंदणी दि. 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत, तर विलंब नोंदणी दि. 22 व 23 नोव्हेंबर या कालावधीत 4 ते 6 यावेळेत होणार आहे.

नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने

संघ व खेळाडू नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या अंतर्गत संघाच्या एका पदाधिकार्‍यामार्फत संघ व खेळाडू नोंदणी फॉर्म घेऊन केएसए कार्यालयामध्ये दिल्यानंतर त्याची अंतिम नोंदणी करण्यात येईल. प्रत्येक संघात कमीत-कमी 16 तर जास्तीत-जास्त 20 खेळाडूंची नोंदणी करता येईल. परदेशी खेळाडूंना बंदी असून, देशपातळीवरील तीन खेळाडूंना नोंदणी करता येणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा बाहेरील व भारत देशातील जन्म असणार्‍या तीन खेळाडूंचा समावेश असणार आहे. याकरिता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ना हरकत पत्र आवश्यक आहे. बदली खेळाडू सुविधेंतर्गत लीगचे सर्व सामने संपल्यानंतर एकूण पाच खेळाडूंची नव्याने नोंदणी करता येणार आहे. यासाठी पाच खेळाडूंची नोंदणी कमी करावी लागेल. त्याजागी बी व सी गटातील खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यात स्वतंत्रपणे जिल्ह्याबाहेरील एका खेळाडूची नव्याने नोंदणी करता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news