विद्यार्थ्यांना डिपॉझिट परत करा ! पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना | पुढारी

विद्यार्थ्यांना डिपॉझिट परत करा ! पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे नेण्यासाठी महाविद्यालयात आल्यानंतर, त्यांना अनामत (डिपॉझिट) रक्कम परत देण्यात यावी, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांना दिल्या आहेत. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णयही प्रसिद्ध केला असून, त्याची अंमलबजावणी करण्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम आकारली जाते. पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी ही रक्कम थोडी कमी, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जास्त असते.

संबंधित बातम्या :

विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ही रक्कम संबंधित महाविद्यालये आणि विद्यापीठाने परत करणे अभिप्रेत आहे. मात्र, काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडून ही रक्कम परत घेतली जात नाही. त्यामुळे ही रक्कम महाविद्यालय आणि विद्यापीठांकडे शिल्लक राहते. ही जमा रक्कम लाखांमध्ये असल्याने, त्याचा विनियोग होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षणानंतर विद्यार्थी त्यांचे प्रमाणपत्र नेण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठात आल्यानंतर, त्यांना ही रक्कम तातडीने परत करण्यात यावी, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी 2 वर्षांपर्यंत रक्कम नेण्यासाठी न आल्यास, त्याचा वापर महाविद्यालये आणि विद्यापीठांना शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासाठी करता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांनाही थोडा दिलासा मिळाला आहे.

क्रेडिट अभ्यासक्रम राबविता येणार…
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती राबविण्यासाठी क्रीडा, संगीत या विषयांशी संबंधित 2 ते 3 क्रेडिटचे अभ्यासक्रम तयार केल्यास संबंधित अभ्यासक्रम राबविण्यासाठी, संगीत किंवा क्रीडा संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी शिल्लक अनामत रकमेचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुकाणू समितीने जाहीर केलेले अभ्यासक्रम राबविण्यासाठी येणारा खर्च संबंधित रकमेत भागवता येणार आहे, असे निर्णयात सांगितले आहे.

शिल्लक अनामत रकमेचा वापर

  •  ग्रंथालयात सोयीसुविधा उपलब्ध करून, नवी पुस्तके खरेदी करणे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करणे.
  •  प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करण्यासोबतच नवी उपकरणे आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी रकमेचा वापर करता येईल.
  •  शिक्षक -शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण करता येणार आहे.

Back to top button