बारामती : पुढारी वृत्तसेवा : 'माझे वय आता 86 आहे. माझ्या मुलाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, असे मला मनोमन वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. बघू पुढे काय होते पाहू,' या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी रविवारी (दि. 5) सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदान केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आशा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाल्या, पूर्वीची काटेवाडी आणि आताच्या काटेवाडीमध्ये खूप बदल झाला आहे. सुनेत्राने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा आमूलाग्र बदल घडवला आहे.
माझ्या समोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. बारामतीकर, काटेवाडीकर त्याच्यावर प्रेम करतात. पण बघू पुढे काय होते, पुढचे काय सांगावे, असे त्या म्हणाल्या. या वेळी आशा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. दादा आजारी आहे, त्याला अशक्तपणा आलाय. त्यामुळे तो मतदानाला आला नाही. मी 1957 पासून मतदान करतेय. यंदा मतदानासाठी लोकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. काटेवाडीत पूर्वी काहीच नव्हते. पण आता काटेवाडीत सांगता येणार नाहीत, इतके बदल झालेत. येथील लोकही आमच्यावर प्रेम करतात, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा :