विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे सरपंच पदाच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत छाया भीमराव पवार या विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी गौरी विश्वासराव जाधव यांच्यावर केवळ पाच मतांनी मात केली. छाया पवार यांना ८४७ तर विरोधी गौरी जाधव यांना ८४२ मते पडली आहेत. या ठिकाणी नोटाला २ मते पडली आहेत.
खानापूर तालुक्यात या टप्प्यामध्ये एकूण ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा देवनगर त्यानंतर साळशिंगे त्यानंतर भेंडवडे राजधानी आणि नंतर गावठाण भेंडवडे अशी मतमोजणी होत आहे. मतमोजणी प्रक्रिया विटा येथील महसूल भवनाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होत आहे. साळशिंगेमध्ये सरपंच पदाच्या सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढत होती. येथे सरपंच पद सर्वसाधारण आहे. या ठिकाणी एकूण ८७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ८७.८९ टक्के मतदान झाले.
साळशिंगे गावच्या तिसऱ्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती महिला या जागेसाठी झालेल्या अंजना बंडू कांबळे आणि ज्योती संतोष यादव यांच्या लढतीत दोघींनाही २९१ अशी समसमान मते पडली. या ठिकाणी नोटाला ११ मते पडली आहेत. त्यामुळे या जागेसाठीचा निकाल राखून ठेवला आहे.
खानापूर तालुक्यातील भेंडवडे गावठाण येथे सरपंच पदाच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत वैभव जानकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी यशवंत जाधव यांच्यावर ३०२ मतांनी मात केली. वैभव जानकर यांना ६७५ तर विरोधी अपक्ष यशवंत जाधव यांना ३६८ मते पडली आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत होती. आमदार बाबर गटाचे वैभव जानकर, आमदार राष्ट्रवादीचे सुजित जानकर आणि अपक्ष यशवंत जाधव अशी लढत झाली.
भेंडवडे गावठाणमध्ये सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत जागेसाठी लढत होती. या ठिकाणी एकूण ९३.६० टक्के मतदान झाले. या ठिकाणी सत्तांतर झाले आहे. पूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी जयंत पाटील गटाचे राजू जानकर यांच्या गटाची सत्ता होती. आता विद्यमान आमदार अनिल बाबर गटाची सत्ता आली आहे.
खानापूर तालुक्यातील भेंडवडे राजधानी येथे सरपंच पदाच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहल विशाल पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी सिंधू हणमंत जानकर यांच्यावर ३६ मतांनी मात केली. स्नेहल पाटील यांना १७१ तर विरोधी सिंधू जानकर यांना १३५ मते पडली आहेत.
भेंडवडे राजधानीमध्ये सरपंच पदाच्या सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढत होती. या ठिकाणी एकूण ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९३.६० टक्के मतदान झाले.