Maratha Reservation : जरांगे पाटील पुन्हा राज्यभर करणार दौरा | पुढारी

Maratha Reservation : जरांगे पाटील पुन्हा राज्यभर करणार दौरा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिंदे समितीची कार्यकक्षा राज्यभर वाढवत सरकार मराठा आरक्षणप्रश्नी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याचे रविवारी (दि.5) जाहीर केले आहे. आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या डेडलाइनपर्यंत आंदोलनात सातत्य टिकून रहावे, यासाठी 1 डिसेंबरपासून गावागावांत साखळी उपोषण देखील सुरु जातील, असेही जरांगे यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नऊ दिवस उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे उपोषण सोडल्यानंतर उपचारासाठी त्यांना शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, माझी प्रकृती चांगली असून, डॉक्टरांनी मला ठणठणीत बरे केले आहे. काळजी करु नका. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. मात्र आता चांगले दिवस येणार आहेत. तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार आहे,असे त्यांनी सांगितले.

आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारीची मुदत सांगितली आहे. तर जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची डेडलाइन दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नेमकी कालमर्यांदा कोणती, याबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ सोमवारी (दि.6) जरांगेची भेट घेणार आहे. यानंतरच डेडलाइनबाबत स्पष्टता होईल.

Back to top button