Pimpri Health News : प्लेटलेट्ससाठी धावाधाव | पुढारी

Pimpri Health News : प्लेटलेट्ससाठी धावाधाव

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये सप्टेबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये जवळपास 35 टक्क्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांची या प्लेटलेट्स मिळविण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये धावपळ सुरू आहे.

प्लेटलेट्सचा जाणवतोय तुटवडा

  • महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या दररोज 20 ते 25 प्लेटलेट्सच्या बॅगा लागत आहेत. प्लेटलेट्सच्या एका बॅगेचे आयुष्य हे पाच दिवसांचे असते. त्या कालावधीत या प्लेटलेट्स वापरल्या गेल्या पाहिजेत.
  • वायसीएम रुग्णालय रक्तपेढीतुन वायसीएम आणि अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये प्लेटलेट्सच्या बॅगा पुरविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, खासगी रुग्णालयातील रुग्णांना देखील त्याची गरज असल्यास ती भागविण्यात येत आहे.
  • तरीही, प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत असल्याचे वायसीएम रुग्णालय रक्तपेढीतील अधिकार्‍यांनी सांगितले. खासगी रक्तपेढ्यांमध्येदेखील प्लेटलेट्सची कमतरता जाणवत आहे. सिंगल डोनर प्लेटलेट्स मात्र उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

रक्तदान शिबिरांसाठी आवाहन

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला असून दिवाळीचा माहौल आहे. दिवाळीत शाळांना लागणार्‍या सुट्ट्यांमुळे नागरिकांचे गावी आणि फिरायला जाण्याचे प्लॅन ठरलेले असतात. त्याचा परिणाम रक्तदान शिबिरांवर होत आहे. शिबिरांची संख्या सध्या घटली आहे. विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी रक्तदान शिबिर घेऊन ही कमतरता भरुन काढावी, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून करण्यात आले आहे.
रुग्णांच्या शरीरातील बोन मॅरो (अस्थि मज्जा) यंत्रणा संथ गतीने काम करु लागते. पर्यायाने, नवीन प्लेटलेट्स कमी तयार होतात. तसेच, आहे त्या प्लेटलेट्स देखील नष्ट होऊ लागतात. सामान्य रुग्णांमध्ये 50 हजारांपर्यंत तर गंभीर रुग्णांमध्ये पाच हजारांपर्यंतदेखील प्लेटलेट्स खाली येतात
– डॉ. राजेंद्र वाबळे, 
अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय 
हेही वाचा

Back to top button