भोगावतीसाठी राष्ट्रवादी पाठोपाठ शेकापही पी.एन. पाटील गटासोबत? | पुढारी

भोगावतीसाठी राष्ट्रवादी पाठोपाठ शेकापही पी.एन. पाटील गटासोबत?

राशिवडे; प्रवीण ढोणे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी धक्कादायक राजकीय उलाढाली होत आहेत. करवीरमधील एकमेकांचे पारंपारिक विरोधक असणारे शेकापचे माजी आमदार संपतराव पवार व काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्यामध्ये राजकीय समेट होण्याची शक्यता आहे. भोगावतीच्या निवडणुकीसाठी शेकाप सतारुढ पी.एन.पाटील गटासोबतच राहणार आहे. या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या राजकीय घडामोडीमुळे करवीरच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

संबंधित बातम्या : 

भोगावतीच्या निवडणुकीसाठी सतारूढ पी.एन. गटाविरोधात एकीचीमोट बांधली जात आहे, अशा राजकीय घडामोडी आकारास येत असतानाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील गटाने सतारूढ पी.एन.पाटील गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणुकच बिनविरोधसाठी पी.एन.यांनी शेकाप, स्वाभिमानी, भाजपा आदी घटक पक्षासोबत चर्चा करण्याची जबाबदारी ए.वाय.पाटील यांच्याकडे दिली. परंतु ताणलेले राजकीय संबधामुळे आणि गटातटाच्या राजकारणामुळे  बिनविरोधची चर्चा बासणातच गुंडाळली. सत्तारूढ गटाविरुध्द मोट बांधण्यासाठी भाजपचे हंबीरराव पाटील, शेकाप संपतराव पवार, स्वाभिमानीचे जनार्दन पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे धैर्यशील पाटील यांच्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकाराने बैठक झाली. यावेळीच युती विरुद्ध महाआघाडी आकारास येईल असे निश्चित वाटत असतानाच शेकापचे संपतराव पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय कळवितो असे सांगितले. त्याप्रमाणे शुक्रवारी सडोली खालसा येथे पवार यांच्या घरी करवीर, राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. पाठींबा कुणाला द्यायचा? याबाबत मतमतांतरे, मनोगते ऐकून घेऊन निर्णयाचे अधिकार पवार यांचेकडे देण्यात आले. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील यांनी आपण सत्तारुढ गटासोबतच राहण्यासाठी आग्रही राहीले. त्यानुसार आज (सोमवारी) काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, संपतराव पवार यांचे चिरंजीव क्रांती पवार-पाटील, अक्षय पवार-पाटील, केरबा भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत या नव्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रामुख्याने करवीरच्या राजकारणातील दोन पारंपारिक घराणी भोगावतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याने राजकीय बेरजांना सुरुवात झाली आहे.

राजकीय संघर्षांना ब्रेक

सडोलीचे दोन पाटील घराण्यांचा राजकीय संघर्ष टोकाचा होता. आणखी किती दिवस संघर्ष करायचा? त्यापेक्षा नव्या चांगल्या विचाराने संघर्ष विसर्जन करुन या दोन्ही घराण्यातील युवापिढीने संघर्षाला पूर्णविराम दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button