

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या घटना घडल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांच्या फोटोंना एका टोपलीत जादूटोणा, भाणामतीसारखा प्रकार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलकडून लोकनियुक्त सरपंचपदासाठी डॉ. शुभदा वाव्हळ, तर श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी यांच्यात अटीतटीची सरळ लढत होत आहे.
एका टोपलीत छाया केदारी, सारिका सोनवणे, प्रशांत खैरे, वैशाली निंबारकर उमेदवारांच्या फोटोला व लिंबाला टाचण्या टोचून, काळी बाहुली लावून, हळद-कुंकू वाहून जादूटोणा व भानामतीसारख्या अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. याबाबत अनिकेत अविनाश कोर्हाळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती रोहिदास केदारी यांनी दिली.
अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे मतदारांनी, तसेच उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्याची मागणी केली आहे. श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल प्रमुख संतोष खैरे यांनी स्टंटबाजी असल्याचे म्हटले असून, पोलिसांनी तपास करून सत्य समोर आणावे, तर श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे रोहिदास केदारी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मतदारांमध्ये भीती निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, की आमच्याकडे तक्रार अर्ज आला आहे?
हेही वाचा