

मुंबई : ताजेश काळे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये १५० एकर शेतजमिनीत घेतलेल्या विराट जाहीरसभेमुळे तब्बल २१३ हेक्टर पिके उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आपत्तीची माहिती मिळताच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४४१ शेतकऱ्यांच्या खात्यांत ३२ लाख रुपयांचे अर्थसाह्य थेट बँक खात्यात जमादेखील झाले.
कोणतीही आपत्ती कोसळली की सहा सहा महिने पंचनामे होत नाहीत आणि त्यानंतर विमा कंपन्याही घोळ घालतात. परिणामी नुकसानभरपाईची वाट बघत बसल्याशिवाय हताश बळीराजा काही करू शकत नसतो. मात्र अंतरवाली परिसरातील शेतकरी त्या तुलनेत नशीबवान ठरले.
१४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांचा अतिविराट मोर्चा झाला, त्यानंतर पंधराव्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबरला सजा अंतरवाली सराटी आणि सजा धाकलगाव तलाठ्यांचे अहवाल अंबड तहसील कार्यालयात पोहोचले. अंतरवालीसह परिसरातील तब्बल आठ गावच्या एकूण ४४१ शेतकऱ्यांची उभी पिके जरांगे पाटील यांच्या विराट मोर्चामुळे उद्ध्वस्त झाली असे हे अहवाल सांगत होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ३० ऑक्टोबरला अंबड तहसीलदारांनी जिरायत, बागायत फळबागांच्या नुकसानीचे स्वतंत्र आणि एकूण विवरण देणारा अ ब क ड अहवाल जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या दफ्तरी पोहोचला आणि बरोबर दोनच दिवसांनी २ नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांना अर्थसाह्य मंजूर करणारे मुख्यमंत्री सचिवालयाचे पत्र जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती पडलेदेखील! जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांग- पाटील यांची विराट जाहीर सभा झाली होती. या सभेसाठी सुमारे १५० एकर जागेवर बुलडोझर फिरवून विस्तीर्ण मैदान तयार करण्यात आले होते. सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंची गर्दी जमली होती. या गर्दीमुळे सभेच्या परिसरातील वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नालेवाडी, टाका, धाकलगाव, दोदडगाव, रामगव्हाण, सौंदलगाव या आठ गावांमधील सुमारे २१३ हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झाले. तलाठ्यांच्या अहवालानुसार या विराट सभेच्या तडाख्यात तब्बल ४२.७० हेक्टर ऊस आडवा झाला. १२.१० हेक्टर कापूस पिकाचे नुकसान झाले. ७८.२० हेक्टरमधील मोसंबीच्या बागा या गर्दीच्या पायाखाली येऊन उजाड झाल्या. जिरायत म्हणजे कोरडवाहू जमिनीत घेतलेल्या पिकांचे नुकसानदेखील ९२.१० हेक्टरच्या घरात गेले. तलाठी तहसीलदार आणि मग जिल्हाधिकारी अशी तिहेरी शासकीय मोहोर या नुकसानीवर उमटताच मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून या आठ गावच्या ४४१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई जमा झाली.