Pimpri News : आंदोलन स्थगित केल्याने लालपरी पुन्हा सज्ज

Pimpri News : आंदोलन स्थगित केल्याने लालपरी पुन्हा सज्ज

तळेगाव स्टेशन : मराठा आरक्षण आंदोलन, शेतकरी किंवा कामगारांचे आंदोलन असो.. नेहमी लालपरीलाच (एसटी) लक्ष्य केले जाते. मराठा आरक्षण आंदोलनामुळे तोडफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन तळेगाव दाभाडे आगारातून एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. सध्या आंदोलन स्थगित करण्यात आल्यामुळे लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज झाली असल्याचे दिसत आहे.

आंदोलनात बसलाच लक्ष्य

मराठा आरक्षण आंदोलनात राज्यात अनेक ठिकाणी लालपरीवर दगडफेक होऊन मोडतोड करण्यात आली होती. यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी बस सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या होत्या. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे लवकरात लवकर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यातच आंदोलन स्थगित करण्यात आल्यामुळे बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

महामंडळालाही आर्थिक फटका

बस फोडल्यानंतर आणि जाळपोळ केल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. तसेच, पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था होईल याची काही शाश्वती नसते. बसची तोडफोड झाली की संवेदनशील भागातील बस रद्द कराव्या लागतात. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची कमालीची गैरसोय होते. राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मोडतोड झालेल्या गाड्यांच्या दुरुस्तीचाही खर्चही करावा लागतो.

मराठा आंदोलनामुळे तळेगाव दाभाडे येथून बीड, पाथर्डीकडे जाणारी एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. सकाळी 6.15 आणि सायंकाळी 6.45 वाजता तळेगावातून बीडला बस सुरू होती. तसेच, सकाळी 6.45 वाजता पाथर्डीला सोडण्यात येणारी एसटी बसही बंद करण्यात आली होती. तसेच, सोलापूर, कोल्हापूर, बीड, पाथर्डीकडे जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत घट झाली होती. सध्या बससेवा पूर्वरत करण्यात आली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news