Pune News : दुष्काळग्रस्त लोणी धामणीवर अन्याय

Pune News : दुष्काळग्रस्त लोणी धामणीवर अन्याय

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर या दोन तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा, तर शिरूर, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, यातून आंबेगाव तालुका वगळण्यात आला असून, कायम दुष्काळी असणार्‍या तालुक्यातील लोणी धामणीवर पुन्हा अन्याय झाल्याची ओरड होत आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये खरंतर आंबेगाव तालुक्याचा समावेश हवा होता. पूर्वेकडील 20 ते 25 गावांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस खरीप हंगामात झाला आहे. खरीप हंगामातील पिके हाती आली नाहीत. पारगाव महसूल मंडळामध्ये बागायती गावांचा समावेश असल्याने पिकांची आणेवारीदेखील जास्त येते. त्यामुळे आणेवारीचा फायदा लोणी, धामणी, शिरदाळे, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा या गावांना होत नाही. त्यामुळे आंबेगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची गरज होती. त्यामुळे किमान दुष्काळी सवलती सूट तरी या गावांना मिळाली असती.

हेही वाचा :

आंबेगाव तालुक्याच्या हद्दीपासून केचळ दोन ते तीन किलोमीटरवर असलेल्या शिरूर तालुका अंशतः दुष्काळ जाहीर केल्याने पाबळ, खैरेवाडी, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, सविंदणे आदी गावांना दुष्काळी सवलती मिळणार आहेत. तर दुसरीकडे खरा दुष्काळ आंबेगाव तालुक्यातील पूर्वभागात आहे. चालू वर्षी पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. गणेशोत्सव काळात पावसाने हजेरी लावल्याने या परिसरातील पाण्याचे टँकर बंद झाले. पण आता जर पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र पुढील महिन्यात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील. शासनाने या गावांचा विचार करून निदान हा भाग तरी दुष्काळग्रस्त जाहीर करावा अन्यथा या भागातील शेतकरी, ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news