Crime News : विद्यापीठातील राड्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

Crime News : विद्यापीठातील राड्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभासद नोंदणीवरून हाणामारी झाली. याप्रकरणी दोन संघटनांनी परस्परविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) दुपारी 12 च्या सुमारास विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीनजवळ घडली. याप्रकरणी सोमनाथ गोविंद निर्मळ (वय 32, रा. सांगावी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महादेव संगप्पा रंगा, आनंद सुखदेव फुसनर, हर्षवर्धन फरफुडे, अनिल ठोंबरे, अंकिता पवार, श्रेया संजय चंदन, सिद्धेरनागेश्वर लाड, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. फिर्यादी हे त्यांच्या इतर सहकार्‍यांसोबत सभासद नोंदणी करीत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महादेव संगप्पा रंगा आणि त्यांचे सहकारी हे लाठ्याकाठ्या येऊन येथे काय करता? असे म्हणत फिर्यादी यांना दमदाटी करीत होते. या वेळी फिर्यादी यांनी सभासद नोंदणी करीत असल्याचे सांगितले असता महादेव रंगा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी टेबल उलटून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

दरम्यान, महादेव संगप्पा रंगा यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानुसार अक्षय गोविंद निर्मळ, अभिषेक मारुती शिंदे, गणेश बाळू जानकर, सोमनाथ गोविंद निर्मळ, अस्मिता धावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर सहमंत्री आहेत. फिर्यादी हे सहकार्‍यांसोबत गेले असता सोमनाथ निर्मळ आणि त्याचे सहकारी पावत्या फाडत होते. या वेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे, आमच्या कामात तुम्ही पडू शकत नाही, असे बोलून शिवीगाळ करून एकाने झेंड्याच्या काठीने कपाळावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मैत्रिणीला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गाडेकर करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button