Pune News : पेयजल योजनेचं काम पाच वर्षांनंतरही अपूर्ण | पुढारी

Pune News : पेयजल योजनेचं काम पाच वर्षांनंतरही अपूर्ण

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोलावडे (ता. भोर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण आहे. पाण्याची टाकी, जलशुध्दीकरण केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच प्रवीण जगदाळे व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी उपसरपंच अविनाश आवाळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आवाळे, प्रशांत पडवळ, ज्ञानेश्वर तारु, गजानन आवाळे उपस्थित होते.

भोलावडे गावची लोकसंख्या 7500 आहे. गणेशनगर, निर्मलनगर, कान्हेगुरुजीनगर, बुवासाहेबवाडी, गावठाणसाठी साडेतीन लाख लिटर पाणी दररोज लागते. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी राष्ट्रीय पेयजल अंतर्गत 4 कोटी 69 लाख रुपयांची पाणी योजना सन 2018 मध्ये मंजूर झाली. यामध्ये पाण्याच्या दोन टाक्या, जलशुध्दीकरण केंद्र आदीचा समावेश होता. बुवासाहेबवाडी येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम निकृष्ट झाले आहे. पाण्याची टाकीला गळती आहे. अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, त्याची चाचणी झालेली नाही.
ही योजना ठेकेदाराने अद्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ठेकेदारावर कारवाई करावी. कामाचे पैसे देऊ नये. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे वारंवार तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याचे जगदाळे व अविनाश आवाळे यांनी सांगितले.

नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा
सदर योजनेची पाण्याची टाकी, पाईप लाईनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. जलशुध्दीकरण यंत्रणेचे काम सुरू आहे. पाण्याची चाचणी करून एक महिन्यात काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदार बी.जी.नलावडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button