पोक्सो न्यायालयाचा निर्णय ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 20 वर्षे सक्तमजुरी

पोक्सो न्यायालयाचा निर्णय ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 20 वर्षे सक्तमजुरी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाळू श्रीमंत ननवरे (रा. टाकळी माढा, जि. सोलापूर) यास येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ननवरे याच्याविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याने अल्पवयीन पीडितेचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केला होता. त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. त्याने तिला 'तुला घरचे कुठेच फिरायला पाठवत नाहीत, आपण देवदर्शनाला जाऊ. तू तुझ्या आई-वडिलांना सांगू नको, ते पाठवणार नाहीत,' असे म्हणत 8 जून 2018 रोजी तिला घरातून पळवून नेले होते. गाणगापूर येथे तिला नेत तेथे तिच्याशी तीन दिवस जबरदस्ती केली होती.

संबंधित बातम्या :

याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी सुरुवातीला इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाची फिर्याद दिली होती. तपासादरम्यान पीडीतेने तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ए. बी. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण 9 साक्षीदार तपासले. आरोपीने केलेले कृत्य घृणास्पद असून, त्याला शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.

न्यायालयाने तो ग्राह्य धरत अत्याचारप्रकरणी 20 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो कायदा कलम 6 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी व अपहरणप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच, ही रक्कम पुरेशी नसल्याने जिल्हा विधी सेवा समितीने कायद्यानुसार तिला नुकसान भरपाई द्यावी, असेही आदेश दिले. या खटल्यात सरकार पक्षाला सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, एन. ए. नलावडे, गिरीश नेवसे यांनी मदत केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news