Pune News : जुन्नर परिसरात बिबट्याची दहशत कायम | पुढारी

Pune News : जुन्नर परिसरात बिबट्याची दहशत कायम

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर शहरालगत असलेल्या अमरापूर, बारव, पाडळी, सोमतवाडी, पिंपळगाव सिद्धनाथ, कुसूर आदी गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. या परिसरात बिबट्यांचे दर्शन नित्याचेच झाले असून, बुधवारी (दि. 1) रात्री अमरापूर गावात बिबट्या भरवस्तीत निवांत फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. अमरापूरसह जाधववस्ती, हापूसबाग या भागांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ राजकुमार जाधव यांनी केली आहे. तर येथील ठाकरवाडी (सोमतवाडी) परिसरात गेल्या चार दिवसांपासून पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, बिबट्या त्यात अडकत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पाडळी गावातही ही दहशत कायम आहे. येथून जुन्नरला येण्यासाठी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी जावे लागते, या वेळी येथील ओढ्यात बिबट्याचे दर्शन अनेकदा झाल्याचे विद्यार्थी सांगतात. या मार्गावरील रस्त्यालगतची झाडेझुडपे वाढल्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढले होते. काही दिवसांपूर्वी दोन दुचाकीस्वारांवर हल्ला झाला होता. त्याबाबत दै.‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने झुडपे काढण्यास सुरुवात केल्याचे माजी उपसरपंच अरुण पापडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button