Pimpri News : मरणही झाले कठीण; अंत्यविधीला मिळेना पाणी! | पुढारी

Pimpri News : मरणही झाले कठीण; अंत्यविधीला मिळेना पाणी!

भास्कर सोनवणे

आकुर्डी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी अमरधाम स्मशानभूमीत गेल्या तीन, चार दिवसांपासून अंत्यविधीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने शोकमग्नावस्थेत असलेल्या मृताच्या स्वकीयांना तसेच त्यांच्या आप्तेष्ठांवरच पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत पाहण्यास मिळाले. या स्मशानभूमीमध्ये येथे अंत्यविधीसाठी येणार्‍यांच्या सोयीसाठी दोन ठिकाणी पाण्याची टाकी आहे; परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून येथे पाणीपुरवठा न झाल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्यांनाच बाहेरून पाणी आणावे लागले.

अजूनही तेथे पाण्याविनाच अंत्यविधी उरकण्याची नामुष्की नातेवाइकांवर येत आहे. गेल्या चार दिवसांपासून पालिका प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा अनुभव अंत्यविधीसाठी येणारे नागरिक घेत आहेत. यासाठी पालिका प्रशासनाने अजूनही पाण्याची पुरेशी व्यवस्था केलेली नाही. लाखो रुपये खर्चूनसुद्धा नागरिकांना स्मशानभूमीत मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी निगडी स्मशानभूमीत उपनगर परिसरातून चार व्यक्तींचा अंत्यविधी पार पडला; परंतु अंत्यविधी करतेवेळी मृत व्यक्तीस गंगाजल (पाणी) देणे विधी महत्त्वाची असल्याने नातेवाइकांवर आणि कार्यकर्त्यांवर बाहेरून पाणी आणण्याची वेळ आली. या वेळी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे व रावेत आकुर्डी परिसर समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पाणी देण्याची व्यवस्था केली.

विद्युत दाहिनीही काही महिन्यांपासून बंदच

गरीब कुटुंबातील व्यक्ती पैसेअभावी विद्युत दाहिनीचा आग्रह करतात; तसेच दुर्धर आजाराने किंवा दीर्घ आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा तसेच पाण्यात बुडून खूप दिवसांपासूनचा मृतदेह असल्यास, संशयीतरित्या झालेल्या व्यक्तीचा मृत्यू यांचा विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधी केला जातो; मात्र काही महिन्यांपासून बिघाड झाल्याने तेही बंदच असल्याने नागरिकांना पिंपरी येथील विद्युतदाहिनी जाण्यास सांगितले जाते. स्वाईन फ्ल्यू व कोरोना काळात विद्युत दाहिनीचा जास्त वापर केला गेला होता.

निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, बिजलीनगर, रावेत, वाल्हेकरवाडी, यमुनानगर, रुपीनगर, तळवडे परिसरातील नागरिक मृतदेहांची अंत्यविधी करण्यासाठी येत असतात. दररोज सरासरी चार ते पाच जणांचा या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडत असतो. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर उपस्थित नागरिक हात, पाय, तोंड धुऊनच स्मशानभूमीतून बाहेर पडतात; परंतु गेल्या 3 दिवसांपासून टाक्यांमध्ये पाणी नसल्यामुळे नागरिकांना तसेच बाहेर पडावे लागत आहे.

विजय पाटील,
राज्याध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती

विधी पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांना बाहेरून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे मृतदेहालासुद्धा
पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. पाण्याची टाकी देखभालदुरुस्ती करताना योग्य नियोजन न केल्यामुळे सदरची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुरक्षारक्षक मात्र फोनद्वारे प्रशासनाकडे स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा करताना दिसून आले. परंतु, त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे दिसून आले.

विशाल शेवाळे, विभागीय अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती

हेही वाचा

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेताळ बांबर्डेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Pimpri News :‘त्या’ डबक्यातील पाणी काढले

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मुकुंदवाडी येथे उंट, गाढव, शेळ्यांच्या गळ्यात अडकवले नेत्यांचे पोस्टर; फोटोंना काळे फासले

Back to top button