छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मुकुंदवाडी येथे उंट, गाढव, शेळ्यांच्या गळ्यात अडकवले नेत्यांचे पोस्टर; फोटोंना काळे फासले | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मुकुंदवाडी येथे उंट, गाढव, शेळ्यांच्या गळ्यात अडकवले नेत्यांचे पोस्टर; फोटोंना काळे फासले

छत्रपती संभाजीनग, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण आता गल्लोगल्ली पसरले असून याचाच एक भाग म्हणून गुरूवारी (दि.२) सकाळी मुकुंदवाडी मुख्य रस्त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. याच दरम्यान माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे यांनी उंटावर बसून सरकार विरोधी घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी दोन गाढवांच्या गळ्यात नेत्यांचे पोस्टर अडकवून त्यांच्या तोंडाळा काळे फासले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा आठवा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने करण्यात येत आहेत. गुरूवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरातील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर टायर जाळत रास्ता रोको केला. यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी काही गाड्या एमआयडीसी मार्गाने चिकलठाण्याकडे वळवल्या. या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आंदोलनात उंट, गाढव, शेळ्यांचा प्रथमच वापर करण्यात आला. या प्राण्यांच्या गळ्यांत विविध नेत्यांचे पोस्टर अडकवून त्यांच्या तोंडाला काळे फासत काही नेते मराठा आरक्षण विरोधी असल्यााचा आरोप करत यावेळी सरकारचा निषेध नोंदवला.

दोन गटात शाब्दिक चकमक

या आंदोलनात सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारमधील नेत्यांच्या तोंडाला काळे फासणे सुरू असतानाच एका गटाने सर्व पक्षीय नेत्यांचे बॅनर झळकावत त्यांच्या तोंडालाही काळे फासण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सरकारमध्ये नसलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. यामुळे दोन गटांत शाब्दिक चकमक उडाली. परंतु तो प्रश्न जाग्यावरच मिटवण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button