निर्यात बंदीमुळे साखरेच्या जादा भावाचा फायदा नाही : सत्यशिल शेरकर | पुढारी

निर्यात बंदीमुळे साखरेच्या जादा भावाचा फायदा नाही : सत्यशिल शेरकर

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगले दर आहेत,जागतिक बाजारात ५० रुपये पेक्षा जादा दर आहेत. केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातल्याने त्याचा फायदा कारखान्यांना घेता येत नाही. देशांतर्गत बाजारपेठेत आता साखरेला बाजारभाव चांगले आहेत. पण आता कोणत्याही कारखान्याकडे जास्त साखर साठा शिल्लक नाही असे प्रतिपादन श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी केले.

सकल मराठा समाज समन्वयक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देत अध्यक्ष सत्यशिल शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी(दि.१) निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे साध्या पध्दतीने संपन्न करण्यात आला,त्यावेळी शेरकर बोलत होते.केंद्र सरकार पूर्णपर्ण देशातील साखरेच्या बाजारभावावर लक्ष ठेवून असते. कोणत्याही परिस्थितीत सर्व सामान्यांसाठी साखरेचे बाजारभाव वाढणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी साखर विक्रीवर अनेक निर्बंध आणले जातात. कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो.

अशी अनेक प्रकारची तारेवरची कसरत करून साखर कारखानदारी चालवावी लागत आहे. साखरेचे व इथेनॉलचे दर पुढील वर्षीही चांगले राहण्याची शक्यता असून यावर्षी तसेच पुढील वर्षीही ऊसाची लागवड वाढविलेस ऊसाला चांगला बाजारभाव मिळेल. इतर शेतीमालाचे अनिश्चित असलेले बाजारभाव लक्षात घेता ऊसाला हक्काचा बाजारभाव मिळतो. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. गाळपावर त्याचा निश्चित परीणाम होणार आहे. हुमणी किडीचाही मोठा प्रादुर्भाव यावर्षी झाला आहे. एकरी टनेज मध्ये घट होण्याची शक्यता असल्याने सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, ऊसाची चारा व इतर विल्हेवाट न लावता संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी घालावा. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रातील विहीरींना अत्यंत कमी पाणी आहे. या सर्व अडचणींचा सामना करत गाळप हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे असेही शेरकर यांनी सांगितले.

ज्यांच्या हस्ते या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला त्या सर्वांचे आभार मानून नियोजित डिस्टीलरी विस्तारीकरण प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पुढे ढकलण्यात आला असल्याचे शेरकर यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले की, गाळप हंगाम २०२३ २४ साठी आपण सुमारे १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याकरीता टायर बेलगाड़ी – ७९८ ट्रैक्टर टायरगाडी-३८०, गाडीसेंटर- १६२ टोळी. डोकेसेंटर-७३ टोळी, ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) १० याप्रमाणे ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज कार्यक्रम झाले नंतर लगेचच प्रत्यक्ष गाळपास सुरुवात केली जाणार आहे.

उपस्थितांचे स्वागत करताना कार्यकारी संचालक भास्कर घुले म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी वर्गाबरोबरच सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांचे विघ्नहर कारखान्यास नेहमीच सहकार्य असते. त्यांनी गाळप हंगाम शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करून धन्यवाद दिले. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

हेही वाचा :

Back to top button