ऊसतोड खर्चकपातीत खासगी कारखाने आघाडीवर | पुढारी

ऊसतोड खर्चकपातीत खासगी कारखाने आघाडीवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात गतवर्ष 2022-23 मध्ये शेतकर्‍यांच्या रास्त आणि किफायतशीर किमतीच्या (एफआरपी) देय रकमेतून ऊसतोडणी व वाहतुकीपोटी सर्वाधिक खर्चकपात करण्यात खासगी कारखान्यांची आघाडी आहे. यामध्ये सर्वाधिक खर्चकपात प्रतिटनास 1218 रुपये 9 पैसे करून कोल्हापूरमधील रिलायबल शुगर हा अत्यल्प गाळप करणारा व चाचणी हंगाम घेणारा खासगी कारखाना अग्रस्थानी राहिला आहे. तर, प्रतिटनास 549 रुपये 80 पैशांइतकी सर्वांत कमी खर्चकपात करण्यास धाराशीवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यास यश आले आहे. सर्वाधिक खर्चकपात करण्यात पहिले 10 कारखाने हे खासगी आहेत.

संबंधित बातम्या :

10 व्या क्रमांकावरील नागपूरमधील मानस अ‍ॅग्रोने किमान 998.96 रुपये, तर नियमित ऊस गाळप हंगाम घेणारा आणि सर्वाधिक खर्चकपात करणारा दोन क्रमांकावरील कारखाना हा अहमदनगरमधील साजन शुगर असून, त्यांनी प्रतिटनास 1146.92 रुपये कपात केली आहे. राज्यात पध्दतीनुसार कारखान्यांमार्फत ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करऊन शेतकर्‍यांच्या वतीने त्यांच्या उसाची तोडणी व वाहतूक केली जाते. यापोटी आलेला खर्च ऊसपुरवठादार शेतकर्‍यांच्या एफआरपीच्या देय रकमेतून कपात करण्यात येतो. गतवर्षी करण्यात आलेल्या ऊसतोडणी व वाहतूकपोटीच्या खर्चकपातीच्या शेतकर्‍यांना माहिती हेण्यासाठी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी परिपत्रकाद्वारे सहकारी व खासगी कारखानानिहाय कपातीची रक्कम घोषित केली आहे. विविध शेतकरी संघटनांकडून हा खर्च जास्त कापला जात असल्याचा आक्षेप व्यक्त केला जातो.

या पार्श्वभूमीवर आगामी ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये तोडणी, वाहतूक खर्च लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी ऊस गाळपासाठी जवळच्या कारखान्यांची निवड करावी, हासुध्दा हेतू परिपत्रकामागे आहे. हा खर्च जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्यांच्या कार्यक्रमानुसार; परंतु स्वतः मालक ऊसतोडणी करून कारखान्यास ऊस गाळपासाठी नेता येईल, याकडेही साखर आयुक्तांनी शेतकर्‍यांचे लक्ष वेधले आहे.

राज्यात गतवर्षीचा हंगाम 2022-23 मध्ये सर्वाधिक ऊसतोडणी व वाहतूक खर्चकपात करणारे पहिले 5 कारखाने. (प्रति मे.टनास) ः

कोल्हापूर : रिलायबल शुगर अ‍ॅण्ड डिस्टिलरी पॉवर लि. -1218.09,

अहमदनगर ः साजन शुगर प्रा. लि. (साईकृपा साखर कारखाना भाड्याने चालविण्यास दिला आहे. 1146.92.

भंडारा ः मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड इन्फ—ास्ट्रक्चर लि. – 1082.26.

नाशिक ः धाराशीव शुगर लि. (वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे.) 1061.96.

छत्रपती संभाजीनगर ः घृष्णेश्वर शुगर प्रा. लि. – 1055.77.

 

“गतवर्षी उसाच्या एफआरपीचा 10.25 टक्के उतार्‍यासाठी प्रति टनाचा दर 3,050 रुपये होता. साजन शुगर या खासगी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा 10.04 टक्के आणि निव्वळ एफआरपीचा दर 2,985.85 रुपये आहे. त्यामधून 1,146.92 रुपये प्रतिटन ऊसतोडणी वाहतूक खर्चकपात करता शेतकर्‍यांना 1,838.93 रुपये मिळाले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा 10.61 टक्के आणि प्रतिटन निव्वळ एफआरपीचा दर 3,159.80 आहे. त्यातून ऊसतोडणीचा खर्च प्रतिटन खर्च रुपये 549.80 वजा करता शेतकर्‍यांना प्रतिटनास 2 हजार 610 रुपये इतका दर मिळाला.
                यशवंत गिरी, साखर संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय, पुणे.

Back to top button