Jalgaon News : कोळी बांधवही पेटले; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फासलं काळं | पुढारी

Jalgaon News : कोळी बांधवही पेटले; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फासलं काळं

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात मराठा आंदोलनाची धग असून त्याने हिंसक वळण घेतले आहे. मात्र, एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवाचे आंदोलन होत असताना दुसरीकडे कोळी बांधवही आपल्या न्यायहक्कासाठी लढत आहेत. गेल्या 23 दिवसांपासून कोळी समाजाच्या आरक्षणात सुलभता व सरळता यावी व ते लवकरात लवकर मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू आहे. यामध्ये काही लोकांच्या प्रकृती खराब झाल्या असून जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी कोळी बांधवांकडून दहा वाजता बांभोरी पुलावर तर साडेअकरा वाजेला आकाशवाणी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीवर लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले व सरकारचा निषेध करण्यात आला.

वाल्मीक समाज आरक्षण मध्ये सुलभता यावी व त्यांना लवकरात लवकर जातीचे दाखले देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी गेल्या 23 दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या दरम्यान प्रकृती खालावलेले सहा जण रुग्णालयामध्ये उपचारही घेत आहे. दि. 30 रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्या समक्ष प्रांत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शासनाला उपोषण कालावधीमध्ये कोळी जमातीच्या किती बांधवांना जिल्ह्याच्या अनुसूचित जमातीचे दाखले दिले गेले हे सांगण्यात असमर्थन आढळून आले. त्यामुळे आज एक नोव्हेंबर रोजी कोळी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, या तीन तोंडी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.

यानंतर सकाळी बांभोरी पुलाजवळ रस्ता रोको करण्यात आला. तर साडेअकरा बारा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळावर च्या बस वर लावण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले व निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी वाल्मीक समाजाचा कार्यकर्त्या मंगला कोळी म्हणाल्या की, या तीन तोंडाच्या सरकारने आम्हाला वाल्मीकचे वाल्या कोळी बनवू नये. नाहीतर या सरकारला पण मुश्किल होऊन जाईल असं बोलून सरकारचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बॅनर वरील चेहऱ्याला काळे फासले. जितेंद्र सपकाळे-प्रभाकर नारायण सोनवणे, संदीप दत्तात्रय कोळी, दिपक सोमा तायडे, सुभाष महारु सोनवणे, विशाल भगवान सपकाळे, भगवान सोनवणे, अनिल नन्नवरे, प्रल्हाद सोनवणे, योगेश बाविस्कर, खेमचंद कोळी, भाईदास कोळी, ऋषिकेश सोनवणे, प्रभाकर गोटू सोनवणे, पंकज सोनवणे, संतोष कोळी, आकाश कोळी अन्य समाज समाज बांधव उपस्थित होते.

Back to top button