Chhatrapati Sambhaji Raje : सर्वपक्षीय बैठक म्हणजे पोकळ बैठक : छत्रपती संभाजीराजे कडाडले

Chhatrapati Sambhaji Raje : सर्वपक्षीय बैठक म्हणजे पोकळ बैठक : छत्रपती संभाजीराजे कडाडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला.

पण सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.

मराठा आरक्षण विषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षण पेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news