

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जसे ओतूर (ता. जुन्नर) हा गाव घरटी एक शिक्षक असल्याने शिक्षकांचा गाव म्हणूनच ओळखला जायचा, तसे गावात एकेकाळी मोठमोठे वाडे असल्याने वाड्यांचे गाव म्हणूनही ओळखले जात होते. वयाने शंभरी पार केलेले अनेक वाडे गावात आहेत. मात्र, आता हे वाडे अखेरच्या घटका मोजत आहे. सद्यस्थितीत गावाचे शहरीकरण होऊन संपूर्ण परिसर सिमेंटच्या गगनचुंबी इमारतीच्या जंगलाने व्यापला आहे. गावातील प्रत्येक आळीमध्ये व पेठा-पेठांमध्ये अनेक नामांकित अवाढव्य वाडे होते व त्यातील मोजकेच वाडे शिल्लक राहिले आहेत. त्या-त्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या नावावरून ते वाडे ओळख दर्शवित होते.
संबंधित बातम्या :
(उदा: वैद्यांचा वाडा, पाटील वाडा, तांबे वाडा, अवचटांचा वाडा, बेदरे वाडा, दीक्षित वाडा, सावकारांचा वाडा, रावत वाडा, चौगुले वाडा आदी). या वाड्यांची त्याकाळी एक दिमाखदार ठेवण होती. रस्त्याला लागूनच अवाढव्य भिंती व थोरला दरवाजा असायचा. त्यातून आत गेलो की ओसरी, सोपा, चोपाळा, त्यानंतर मधलेघर, त्याला लागून अंधारी खोली जिला बाळंतीणीची खोली म्हणत, तीन-चार चुलते, त्यांच्या बायका, मुलं, नातवंड वाड्यात एकत्र राहात असत. त्यामुळे वाड्यात पोरवडा भरपूर असायचा. एकेकाला पाच ते सहा मुले असायची. त्यामुळे बाळंतीणीच्या खोलीत सतत पाळणा टांगलेलाच असायचा. त्यानंतर स्वयंपाकघर. तिथे चूल सतत पेटती असायची.
घरातल्या पंधरा-वीस माणसांचा स्वयंपाक चुलीवर केला जात असल्याने ती सतत धगधगत असायची. तिला विसावा कधी नसायचाच. स्वयंपाकघरातच सागवानी अथवा चंदनाच्या लाकडाचे नक्षीकाम केलेले सुबक असे एका बाजूला देवाची खोली प्रशस्त (देवघर) असायचे. वरच्या मजल्यावर लाकडी भिंतीततच तयार केलेल्या बोगदेवजा जिन्याने वर गेल्यावर ओळीने माड्या असायच्या. त्या प्रत्येक माडीला विशिष्ट नावं असायची. त्या-त्या नावाने ती माडी ओळखली जायची. संपूर्ण वाड्याचे बांधकाम हे सागवानी लाकडाचा कडीपाट, घडीव दगडाचा मजबूत पाया व पांढर्या मातीच्या बनवलेल्या 1 बाय 1 आकाराच्या विटांचे बांधकाम असायचे. वाड्याच्या मागील बाजूला भलेमोठे अंगण, त्यात पाण्याचा आड, तुळशी वृंदावन, अंघोळीला पाणी तापविण्याचा बंब, अंधोळीसाठी कोरीव दगडी चौरंग व एखादी मोरी आणि त्यामागे परसदार, देशी गाई व म्हशींचा गोठा या पध्दतीची ठेवण असलेले असंख्य वाडे ओतुरमध्ये होते. त्यांची आजची एकूण संख्या अगदीच नगण्य होऊन ते नामशेष झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
काही वास्तूंचे केले जतन
वास्तू जतन करण्याच्या उद्देशाने व्यवस्थित देखभाल केल्याने पेठेतील सुनील वैद्य, सराफ गल्लीतील काका तांबे, श्रीछत्रपती शिवाजी रोडवरील स्व.आबासाहेब पाटील डुंबरे यांचे वाडे त्याकाळचा दिमाखदारपणा टिकवून आजही उभे आहेत.