Pune News : भीमा पाटस साखर कारखान्यावर ऊसतोडणी कामगार दाखल | पुढारी

Pune News : भीमा पाटस साखर कारखान्यावर ऊसतोडणी कामगार दाखल

कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा :  पाटस (ता. दौंड) येथील भीमा पाटस सहकारी साखर (श्री. साईप्रिया शुगर) कारखान्याचा गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणात ऊस गळीत करण्यासाठी भीमा पाटस साखर कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. दि. 5 नोव्हेंबरपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटणार असून, यंदाच्या वर्षी 10 लाख मेट्रिक टनाचे गाळप कारखान्याकडून केले जाणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. कारखाना परिसरात ऊसतोडणी कामगार दाखल झाले असून, कारखाना परिसरात ऊस गळीत करण्यासाठीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. दि. 5 नोव्हेंबरला कारखान्याचे धुराडे पेटणार असून, यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडे 22 हजार हेक्टर उसाची नोंद झाली असून, 15 हजार हेक्टर क्षेत्राचा ऊस कारखान्याला मिळेल.

संबंधित बातम्या :

यातून यंदाच्या हंगामी 10 लाख मेट्रिक टनाचे गळीत करण्यात येणार आहे. यासाठी कारखान्याला ऊस आणण्यासाठी 350 बैलगाडे, 420 ट्रॅक्टर-टेलर वाहतूक, 450 ट्रॅक्टर-बैलगाडे व्यवस्था केल्याची माहिती कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी भारत रोकडे यांनी दिली.
कारखान्याला ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टरची सोय योग्य पद्धतीने व्हावी व गव्हाणीत ऊस टाकण्यासाठी कसलीच अडचण निर्माण होऊ नये, यासाठीची काळजी घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ऊस गळीत करण्यासाठी कामगार सज्ज झाले आहेत, तर कारखान्याच्या मशिनरीची सर्व्हिसिंग व दुरुस्ती करण्यात आली आहे. कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांसाठी नेहमीच्या जागेवर राहण्याची सोय केली असल्याने त्या ठिकाणी वीज, पाणी, किराणा दुकान, पीठगिरणीची सोय करण्यात आली आहे. कारखान्याचा हंगाम सुरू होण्याची लगबग सुरू झाल्याने पाटस गावच्या बाजारपेठेत उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे गावचे व्यापारी कारखाना सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.

Back to top button