Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा फटका : जळगाव जिल्ह्यात ६४ बस फेऱ्या रद्द | पुढारी

Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा फटका : जळगाव जिल्ह्यात ६४ बस फेऱ्या रद्द

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारलेले आहे. जागोजागी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाने हिंस्र वळण घेतल्यामुळे याचा फटका महामंडळाच्या लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांनाही बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांमधून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या ६४ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे जळगाव जिल्हा बस आगाराचे पाच लाख ६४ हजाराचा १३१ रुपयाचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे.  ( Maratha Reservation )

संबंधित बातम्या

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, यावल, भुसावळ या आगरामधून राज्यातील सोलापूर, लातूर, बारामती, माहूरगड, पुणे, संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशा लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या सुरू असतात. या फेऱ्या सकाळी व दुपारी अशा दोन भागांमधून असल्याने प्रवाशांना सोयीचे होते. दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केली जात आहेत. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने व सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक पुकारल्यामुळे जळगाव जिल्हातील आगराने इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या व लांब पल्ल्याच्या ६४ बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील एसटी महामंडळाला पाच लाख ६४ हजार १३१ रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

यामध्ये सकाळच्या सत्रात जळगाव डेपोतून पुणे चार, नाशिक दोन, बारामती दोन, माहूरगड दोन, जामनेर- संभाजीनगर आठ, बोदवड- संभाजीनगर दोन, पुणे दोन, चाळीसगाव- पंढरपूर दोन, सोलापूर दोन, चोपडा- संभाजीनगर दोन, यावल- माहूरगड दोन, भुसावळ- संभाजीनगर दोन अशा फेऱ्या रद्द झालेल्या आहेत. तर दुपारी जळगाव- चिंचवड चार, जामनेर -संभाजीनगर चार, जामनेर- चिंचवड दोन, पारोळा- चिंचवड दोन, यावल- चिंचवड दोन, मुक्ताईनगर- संभाजीनगर दोन, मुक्ताईनगर- चिंचवड चार, पारोळा- पंढरपूर चार अशा फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

याबाबत सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘आम्ही प्रवाशांना सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच आहोत. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होऊ म्हणून या फेऱ्या रद्द करण्यात आलेला आहे. आंदोलन थांबल्यानंतर आम्ही पूर्ववत सेवा सुरू करू.’
– युवराज साबळे (जळगाव)

Back to top button