Pimpri News : अन् काही दिवसांतच तारांगणला गळती ! | पुढारी

Pimpri News : अन् काही दिवसांतच तारांगणला गळती !

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी तारांगण उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन 15 मे 2023 ला करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत पावसाचे पाणी तारांगणाच्या डोममधून गळू लागले आहे. त्यामुळे अनेक दिवस तारांगण बंद करून त्याला टाळे लावण्यात आले होते. डोमच्या दुरुस्तीसाठी 20 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.
मोठा गाजावाजा करीत महापालिकेने सायन्स पार्कशेजारी तारांगण उभारले होते. शहरातील विद्यार्थ्यांना अवकाश, खगोल, ग्रह व तारे या संदर्भातील माहिती मिळावी म्हणून हे तारांगण उभारण्यात आले.

सल्लागार व आर्किटेक्ट पी. के. दास याच्या मार्गदर्शनाखाली हे तारांगण उभारण्यात आले आहे. तारांगणचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 मे 2023 ला झाले. हे तारांगण पाहण्यासाठी शहरातील विद्यार्थी तसेच, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पावसाळ्यात तारांगणच्या आतमध्ये पाणी येऊ लागले. डोममधून पावसाचे पाणी गळू लागले. त्यामुळे तारांगणमधील शो बंद करण्यात आले. डोमची दुरुस्ती करणार्‍या एजन्सीची संख्या कमी आहे. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय अ क्षेत्रीय स्थापत्य विभागाने घेतला आहे.

डोम दुरुस्तीसाठी 20 लाख रुपयांचा खर्च

डोमच्या काचेच्या जॉईटमधून पावसाच्या पाण्याची गळती होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्या जॉइॅटला धातुची पट्टी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 20 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी महापालिकेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील नदीकाठचा 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे या लेखाशिर्षावर 1 कोटी 50 लाखांचा निधी आहे. त्यापैकी 20 लाखांचा निधी तारांगण दुरुस्तीसाठी वळविण्यात आला आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हेही वाचा

Back to top button