

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत सोशल मीडियाच्या दोघा पत्रकारांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागून यातील सहा लाख रुपये खंडणी उकळण्यात आल्याची फिर्याद येथील व्यावसायिकाने भिगवण पोलिसात दिली आहे. यावरून पोलिसांनी सोशल मीडियाच्या दोन पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सुंदर कुसाळकर (रा. भिगवण, ता. इंदापूर) व पल्लवी जीवन चांदगुडे (रा. म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भिगवण येथील व्यावसायिक सुरेश सोपान पिसाळ (रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खंडणीचा हा प्रकार दि. 18 ते 23 ऑक्टोबर या दरम्यान घडला आहे. पिसाळ यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा आकाश ऊर्फ बंटी पिसाळ याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व फोटो तसेच व्हिडिओ आमच्याकडे आहेत, गुन्हा दाखल केला तर तुमच्या मुलाची समाजामध्ये बदनामी होईल, असे म्हणून गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी वेळोवेळी आपल्याकडून सहा लाख रुपये रोख खंडणी स्वरूपात घेतले. आणखी 50 लाख रुपये खंडणीची मागणी या दोघांनी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी आपल्याकडे करण्यात आली होती, तर तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरवून ते देण्यात आले होते. पुन्हा एवढ्या पैशात प्रकरण मिटवण्यात येणार नाही, असे सांगून 15 लाखांची मागणी करण्यात आली, त्यावर आपण दोन लाख दिले तरीही मुलाच्या बदनामीची भीती दाखवून आठ लाखांची मागणी करण्यात आली. यातून आपण वेळोवेळी 6 लाख रुपये खंडणी स्वरूपात दिली, तरी पुन्हा 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर या खंडणीला कंटाळून आपण पोलिसात तक्रार देत असल्याचे पिसाळ यांनी म्हटले आहे. यावरून भिऊन पोलिसांनी सुंदर कुसाळकर व पल्लवी चांदगुडे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात केवळ आपण सांगण्यावरून मध्यस्थी केली, तरीही खोटा गुन्हा आपल्यावर दाखल करण्यात आल्याचा आरोप पल्लवी चांदगुडे यांनी केला आहे. आपल्याला न्याय न मिळाल्यास 31 ऑक्टोबर रोजी आपण ग्रामीण पोलीसि अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करू, असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.