सोलापूर : पटवर्धन कुरोली येथे मराठा आरक्षण मिळेपर्यंत चक्रीय उपोषण | पुढारी

सोलापूर : पटवर्धन कुरोली येथे मराठा आरक्षण मिळेपर्यंत चक्रीय उपोषण

सोलापूर : पटवर्धन कुरोली – पुढारी वृत्तसेवा – अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाला समर्थन करण्यासाठी पटवर्धन कुरोली येथे चक्रीय उपोषणाला सुरुवात झाली. आजपासून आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण आहे. आज पटवर्धन कुरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चक्रीय उपोषणाला शांततेच्या मार्गाने सुरुवात केली. दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जोर धरताना दिसत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ओबीसीमध्ये सामील करून ५० टक्केच्या आतमध्ये आरक्षण देऊन आंदोलनात युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. याच गोष्टींला पाठिंबा देण्यासाठी पटवर्धन कुरोली येथे आजपासून चक्रीय उपोषणाला सुरुवात केली. तसेच गावांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी गावात येण्यास बंदी घातली आहे.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुस्लिम समाज, सकल नाभिक समाज, लिंगायत समाज तसेच दलित समाज यांच्याकडून एक मोठा भाऊ म्हणून पाठिंबा देण्यात आला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा समाजातील समाजबांधव हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Back to top button