धुळे : शिक्षणाधिका-यासह, वरिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना अटक | पुढारी

धुळे : शिक्षणाधिका-यासह, वरिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा; अपेक्षित ठिकाणी बदली करून देण्याच्या मोबदल्यात एका प्राथमिक शिक्षकाकडून तब्बल 35 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आणि त्याच्या वरिष्ठ सहाय्यकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामधील भ्रष्टाचार ऐरणीवर आला असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

शिरपूर तालुक्यातील पेसा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका प्राथमिक शिक्षकाने त्यांना नॉन पेसा क्षेत्रामध्ये बदली करून द्यावी, यासाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात संपर्क केला. ही बदली धुळे तालुक्यात नॉन पेसा क्षेत्रात अपेक्षित ठिकाणी करावी, यासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांना संपर्क केला .या बदलीच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आली .त्याचप्रमाणे यासाठी वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी तक्रारदार शिक्षकाला केली. त्यानुसार शिक्षकाने या दोघांबरोबर बोलणे सुरू ठेवले. अपेक्षित ठिकाणी बदली करून दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बदलीचे आदेश काढून देण्याचे देखील या दोघाही लाचखोर अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांना सांगितले. यात तडजोडी अंती 71 हजार रुपये देण्याचे ठरले . यातील पहिला हप्ता म्हणून 35 हजार रुपये आज देण्याचे निश्चित झाले. ही रक्कम प्राथमिक शिक्षणाधिकारी साळुंखे यांच्या दालनातच देण्याचे निश्चित झाल्यामुळे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकाला सापळा लावण्याचे आदेश केले. त्यानुसार सापळा लावला असता दालनात 35 हजार रुपये लाच घेताना विजय पाटील आणि राकेश साळुंखे या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी नियमित होतात. मात्र आज एका जागरूक शिक्षकाच्या तक्रारीवरून हा प्रकार ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

Back to top button