Chandrakant Patil : जगभरात भारतीयांना मोठी संधी : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : जगभरात भारतीयांना मोठी संधी : चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जो-जो कोणी आर्थिक अडचणीत होता, त्याला मदत करण्याचे काम माजी आमदार विनायक निम्हण यांनी केले. तेच काम आता विनायकी शिष्यवृत्तीमधून होत आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत. जगभरात भारतीयांना मोठ्या संधी निर्माण झाल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आमदार विनायक निम्हण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनकडून गुरुवारी आयोजित केलेल्या विनायकी गौरव शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेना उपनेते (उद्धव ठाकरे गट) सचिन अहिर, आमदार अतुल बेनके, सिद्धार्थ शिरोळे, सत्यजित तांबे, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शा. बं. मुजुमदार, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, माजी मंत्री सुरेश नवले आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, 'कुणाची आर्थिक स्थिती काय आहे हे माहिती नसतं. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, मलाही शिष्यवृत्ती मिळाली आणि शिक्षण पूर्ण झाले. नोकर्‍या आहेत, पण चांगली माणसं मिळत नाहीत.

भारताकडे जर्मनीने चार लाख चांगल्या विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना जर्मनीला पाठविण्यासाठी मंत्र्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. 'अहिर म्हणाले, 'लोकप्रतिनिधी यशस्वी उद्योजक होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने नैतिकतेचा विषय पुढे आला. मात्र, सध्या येथे वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते उपस्थित आहेत, त्यामुळे राजकीय मंडळींच्या नैतिकतेविषयी न बोललेच बरं. 'अनास्कर म्हणाले, 'ही शिष्यवृत्ती केवळ शिक्षणासाठी नाहीतर नैतिकतेची शिकवण देणारी शिष्यवृत्ती आहे. शिक्षणात सध्या नैतिकतेचा अभाव आहे.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले.

तांबे नेमके कुठं हे कळेना..

'निवडणुकीच्या वेळी शेवटच्या प्रसंगापर्यंत कळलं नाही, ते नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहेत. अजूनही ते नेमकं कुठं आहेत, हे आजपर्यंत देखील कळलेलं नाही,' असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा उल्लेख करत सत्यजित तांबे यांना काढला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news