धक्कादायक ! विद्यार्थिनीच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर

धक्कादायक ! विद्यार्थिनीच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत भोरमळा रस्त्यालगत डिंभे उजवा कालवा परिसरात शाळेत चाललेल्या दहावीच्या विद्यार्थिनीच्या तोंडावर अज्ञात दोन व्यक्तींनी मिरची पावडर टाकल्याची घटना बुधवारी (दि. 25) घडली. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर शालेय शिक्षण घेत असलेल्या याच विद्यार्थिनीच्या बहिणीच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याचीही घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी व पालकांना धीर देत कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

अवसरी येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी भोरवाडी, तांबडेमळा येथून अनेक विद्यार्थी येतात. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीबरोबर सायकलवर येत असताना भोरवाडी कालव्यालगत तांबडेमळा येथे नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवर तोंड बांधून दोन अज्ञात आले. त्या दोघांनी या मुलीला अडविले. त्या वेळी मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मुलीची सायकल ओढून धरत तिच्या तोंडावर व डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्या वेळी तिच्याबरोबर असलेली मैत्रीण व तिने जोरजोरात आरडाओरडा केला असता ते दोघे पळून गेले. मिरची पावडर टाकलेल्या मुलीच्या बहिणीच्या अंगावर स्प्रे मारण्याची घटनाही याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी घडली होती. याबाबत श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर मंचर पोलिसांसह विविध पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करीत पाहणी केली आहे. मिरची पावडर टाकलेल्या विद्यार्थिनीला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेऊन उपचार करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news