Pune News : घटाचे साहित्य थेट नदीपात्रात ; जागोजागी साचले कचर्‍याचे ढीग | पुढारी

Pune News : घटाचे साहित्य थेट नदीपात्रात ; जागोजागी साचले कचर्‍याचे ढीग

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य गोळा करण्याची तसेच हौदांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था पुणे महापालिकेकडून केली जाते. मात्र, नवरात्रातील घटाचे निर्माल्य गोळा करण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेने न केल्याने मुठा नदी घाट परिसरातील ओंकारेश्वर घाट, सिद्धेश्वर घाट, आपटे घाट परिसरात गुरुवारी (दि.25) मोठ्या प्रमाणात निर्माल्या टाकल्याचे दिसून आले. शनिवार पेठ परिसरातील नाना-नानी उद्यानाजवळील आपटे घाटावर, तर गुरुवारी सकाळच्या वेळीस घटाच्या साहित्यांचे ढीग साठले होते. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी नागरिक घटाचे साहित्य नदीपात्रात किंवा नदीत आणून सोडतात, हे माहीत असूनसुद्धा महानगरपालिकाच्या कर्मचार्‍यांकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. कोणत्याही प्रकारचे निर्माल्य कलश, प्रत्येक ठिकाणी कंटेनर तसेच पालिकेचे कर्मचारी दिसत नसल्याने नागरिक थेट नदीवर जाऊन प्लास्टिक पिशवीतून घटाचे साहित्य व निर्माल्य नदीत सोडताना दिसत होते.

संबंधित बातम्या :

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही घटाचे साहित्य विसर्जन करण्यासाठी मुठा नदीपात्रानजीकच्या शनिवार, नारायण, सदाशिव, कसबा पेठ, पुलाची वाडी, शिवाजीनगर, भांबुर्डा परिसरातील नागरिक सकाळपासून घट विसर्जन करण्यासाठी तसेच घटाचे साहित्य, निर्माल्य मुठा नदीपात्रात सोडण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला येताना दिसत होते. काही जण तर रिद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाच्या कॉजवेवर बसून नदीत घट, निर्माल्य सोडताना दिसले तर काही नागरिक नदीकाठच्या पायर्‍यांवर घटाचे साहित्य ठेवून जाताना दिसत होते. मुठा नदीकिनारी साठलेली हारफुले, परडी,नारळ, पाने, पत्रावळी, मातीचा घट, घटाची माती, फळे, कापूस, दोरे, आपट्याची पाने, निर्माल्य नदीकाठी ठिकठिकाणी पडल्याने नदीकिनारी अक्षरक्षः ढीग साठल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. मुठा नदीच्या पाण्यावर वाहणारी फुले, नारळ, पाने, फळे, नदीच्या पाण्यांबरोबर वाहून जातानाचे चित्र ओंकारेश्वर पुलावरून दिसत होते.

 

गाडी फेल झाल्याने यावर्षी कंटेनर ठेवता आले नाहीत. आपटे घाटावरील सर्व साफसफाई त्वरित होऊन जाईल. परिसर स्वच्छ केला तरी नागरिक पुन्हा साहित्य आणून टाकतात. महापालिकेच्या वतीने दरवर्षी आवाहन करण्यात येते.
       नंदकुमार महांगरे, आरोग्य निरीक्षक, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय

Back to top button