Pune News : जिल्हा बँकेसाठी पार्थ पवार, मदननाना देवकाते की आणखी कोण? | पुढारी

Pune News : जिल्हा बँकेसाठी पार्थ पवार, मदननाना देवकाते की आणखी कोण?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरील निवडीसाठी 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. बारामतीतून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, मदननाना देवकाते की आणखी कोणाला संधी मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बारामती तालुक्यातील ’अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातून ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्यालयात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची सभा होईल, त्यामध्ये पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर संचालकांची निवड होईल.

संबंधित बातम्या :

निवडणुकीसाठी सकाळी 11 ते 11.30 पर्यंत अर्ज वाटप व स्वीकारण्यात येतील. अर्जांची छाननी 11.30 ते 12 या वेळात होईल. वैध अर्जाची यादी 12 वाजून 15 मिनिटांनी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर दुपारी 12.15 ते 12.30 पर्यंत अर्ज माघार घेता येईल. अंतिम उमेदवारांची यादी 12.30 वाजता जाहीर होईल. मतदानप्रक्रिया 12.30 ते 1 पर्यंत चालेल. मतमोजणी दुपारी 1 ते 1.30 पर्यंत चालेल आणि निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव मतमोजणीनंतर घोषित करण्यात येईल.

जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या संचालकपदाच्या जागेसाठी बारामती तालुक्यातील शेतकरी सभासद अर्ज करू शकतील. संचालक मंडळामध्ये आलेल्या अर्जांवर मतदान होईल. जिल्हा बँकेवर अजित पवार यांचेच एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे नेमके नाव कोणाचे येणार, ही उत्सुकता आहे. जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले चिरंजीव पार्थ पवार यांना की तालुक्यातील अन्य कोणाला संधी देणार, याबद्दलची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र, बारामती तालुक्यातून या रिक्त जागेसाठी मोठ्या संख्येने अर्ज आल्यास निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

Back to top button