पुणेकरांसाठी खूशखबर ! मेट्रोच्या तीनपैकी 1 मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू होणार | पुढारी

पुणेकरांसाठी खूशखबर ! मेट्रोच्या तीनपैकी 1 मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या तीन मार्गिकांपैकी एका मार्गिकेचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्यामुळे वनाज ते रामवाडीपर्यंत पुणेकरांना थेट प्रवास करता येणार आहे. तर, दुसर्‍या पिंपरी ते स्वारगेट (सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट) या मार्गिकेसाठी एप्रिल उजाडणार आहे. मेट्रोचे पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील निम्मे मार्ग सुरू झाले आहेत. त्यात वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते सिव्हिल कोर्ट हा मार्ग सुरू झाला आहे. याद्वारे प्रवासी सेवादेखील सुरू झाली आहे. उर्वरित रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्थानक आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गावर वेगाने काम सुरू असून, डिसेंबर अखेरपर्यंत  रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्थानक आणि एप्रिल अखेरपर्यंत सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक हे मार्ग प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात येतील, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.
संबंधित बातम्या :
ट्रायल रन यशस्वी…
रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकापर्यंतची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ट्रायल रन शुक्रवारी (दि.6) सायंकाळी 7.30 वाजता पार पडली. ट्रायल रन दरम्यान बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी स्थानकांवरून मेट्रो धावली. 5.5 किलोमीटरच्या अंतरासाठी मेट्रो ट्रेनला 1 तास लागला. यामध्ये एक राउंड ट्रिप घेण्यात आली. चाचणीच्या संपूर्ण कालावधीत ट्रॅक, वीज, सिग्नलिंग, देखभाल आणि ऑपरेशन्ससह पुणे मेट्रोच्या सर्व विभागांनी ट्रायल रन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
आतापर्यंतचे काम
पहिला टप्पा…(उद्घाटन दिनांक – 6 मार्च 2023)
वनाज ते गरवारे कॉलेज – 5 कि. मी.
स्थानके :- वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज
पीसीएमसी ते फुगेवाडी – 7 कि. मी.
स्थानके – पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी(नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी
दुसरा टप्पा…(उद्घाटन दिनांक – 1 ऑगस्ट 2023)
गरवारे कॉलेज ते रुबी हॉल स्टेशन – 4.7 किलोमीटर
स्थानके – डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ (आरटीओ), रुबी हॉल क्लिनिक स्टेशन
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट – 6.9 किलोमीटर
स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट
…असे पूर्ण होणार उर्वरित टप्पे
तिसरा टप्पा…(डिसेंबर 2023 अखेरपर्यंत)
रुबी हॉल ते रामवाडी – 06 कि.मी.
स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी
चौथा टप्पा…(एप्रिल 2024 अखेरपर्यंत होणार)
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट – 05 कि.मी.
स्थानके – बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट

Back to top button