ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारा अर्‍हाना ताब्यात

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पळून जाणार्‍या ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करणार्‍या विनय अर्‍हाना याला पुणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधी अटक केली होती. दरम्यान, त्याच्यासह भूषण पाटील, अभिषेक बलकवडे या तिघांना अटक करून गुरुवारी पळून जाण्याच्या गुन्ह्यात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे.

संबंधित बातम्या :

ससून रुग्णालयाच्या गेटजवळ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर गुन्ह्यात ललित पाटीलचा सहभागदेखील समोर आला. मात्र, तो ससून रुग्णालयातून पसार झाला. त्याला कोणी-कोणी मदत केली याचा तपासही पोलिस करत होते. तेव्हा पुणे पोलिसांनी तपास करताना सर्वप्रथम विनय याचा वाहनचालक दत्ता डोके याला अटक केली होती. त्याने ललितला ससून रुग्णालयातून पळल्यानंतर कारमधून पुणे शहराच्या बाहेर सोडले होते. तसेच त्याच्याकडून 10 हजार रुपयेदेखील घेतले होते. याच तपासात नंतर ललित याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे व अर्चना निकम यांना अटक केली होती. दरम्यान, डोके याच्याकडे पुणे पोलिसांनी तपास केला असता विनय याचादेखील या गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यामुळे त्याला पुणे पोलिस तळोजा कारागृहातून घेऊन पुण्यात रात्री उशिरा दाखल होतील.

लोहरे, कांबळे यांना सोमवारपर्यंत कोठडी
ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आज पुणे पोलिसांनी प्रज्ञा कांबळे व केमिकल इंजिनीअर अरविंदकुमार लोहरे याना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान प्रज्ञा हिने ड्रग्जच्या पैशातून कार घेतल्याचे समोर आले आहे. तसेच ती ससून रुग्णालयात असतानादेखील ललितला लेमन ट्री हॉटेलमध्ये भेटत होती. त्यांनी ड्रग्जच्या डीलदेखील केल्या असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच लोहरे याने आरोपी पंत याच्या मदतीने बोर्मीशन रिअ‍ॅक्शनचा फॉर्म्युला (ड्रग्ज) दिला व नाशिकमधील कारखाना सुरू केला. दोघांनाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांनी पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील इथापे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news