चांगली बातमी ! ’परिवर्तन’मुळे तिमिराकडून तेजाकडे ! पाचशे मुले गुन्हेगारीपासून परावृत्त | पुढारी

चांगली बातमी ! ’परिवर्तन’मुळे तिमिराकडून तेजाकडे ! पाचशे मुले गुन्हेगारीपासून परावृत्त

अशोक मोराळे

पुणे : ‘परिवर्तन’च्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल पाचशे विधिसंघर्षित (अल्पवयीन) मुलांना गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढले आहे. समुपदेशन, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगारासाठी मदत, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पोलिसांनी हे करून दाखविले आहे. शहरातील तब्बल दहा हजार लहान मुलांची विधिसंघर्षित म्हणून नोंद घेण्यात आली असून, त्यांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ‘परिवर्तन’ हा उपक्रम त्यांच्यासाठी तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा मार्ग ठरत आहे.

संबंधित बातम्या :

शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचे वाढते प्रमाण लक्षात येताच पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या नियंत्रणाखाली एक समिती स्थापन केली. पोलिस ठाणे, परिमंडलनिहाय अभ्यास करून कारणांचा शोध घेतला. त्या वेळी अनेक कारणे समोर आली. त्यानुसार एक सूत्रबद्ध कार्यक्रम हाती घेतला. भरोसा सेलमधील बालसुरक्षा पथक, पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालय या सर्वांना या उपक्रमात सहभागी केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही

दिवसांपासून गुन्हेगारीतील मुलांचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 284 गुन्ह्यांमध्ये तब्बल 399 विधिसंघर्षित मुलांचा सहभाग होता, तर या वर्षी 164 गुन्ह्यांत 338 विधिसंघर्षित बालके असल्याचे समोर आले . जन्माला येताना कोणीच कधी गुन्हेगारीचा शिक्का घेऊन येत नाही. परिस्थिती, समाज, इतरांचे अनुकरण, ग्लॅमरस जीवन जगण्याचा मोह, भाईगिरीची हवा मुलांना गुन्हेगार बनवते. मुलांना गुन्हेगारी कृत्यांच्या परिणामांची कल्पनादेखील नसते. त्यातच आई-वडिलांशी तुटलेला संवाद किंवा घरातील इतर अनेक गुंतेही कारणीभूत ठरतात. विविध माध्यमांतून त्यांच्यापुढे येणारी हिंसक दृश्ये यांचेही त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत राहतात. त्यातूनच अनेक जण अनावधानाने गुन्हेगारी मार्गावर जातात. मात्र, त्यांना आता यातून बाहेर काढण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे.

कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
प्रत्येक पोलिस ठाण्यात विधिसंघर्षित मुलांसाठी नोडल ऑफिसरची नेमणूक, अल्पवयीन मुलांचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. त्यानंतर गुन्ह्यांचे किरकोळ, गंभीर आणि क्रूरतेने केलेले गुन्हे, अशा तीन प्रकारांत वर्गीकरण केले. पुढे त्या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा सोशल बॅकग्राउंड रिपोर्ट तयार केला. यानंतर पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालयस्तरावर समुपदेशन कार्यक्रम हाती घेतला. येथे मुलांना आणि त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. मुलांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळे भविष्यात काय परिणाम होतील, शिक्षण, नोकरी करताना काय अडचणी येतील, हे समजावून सांगण्यात आले. एखाद्या मुलाने वारंवार गंभीर गुन्हे केले, तर न्यायालयाच्या आदेशानुसार गंभीर गुन्हे करणार्‍या व्यक्तीप्रमाणे कारवाई करण्यात येते हेदेखील पटवून देण्यात आले. ही मुले पुन्हा गुन्हेगारी वाटेवर जाऊ नयेत म्हणून त्यांना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.

अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढता सहभाग निदर्शनास आल्यानंतर ‘परिवर्तन’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. पुढील कालावधीत अधिक चांगले सकारात्मक परिणाम दिसतील. पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालयस्तरावर ‘परिवर्तन’चे प्रभावी काम सुरू आहे.
                                                 – रितेश कुमार,पोलिस आयुक्त, पुणे शहर

Back to top button