

पुणे : स्थूलतेवरील शस्त्रक्रिया अर्थात बेरियाट्रिक सर्जरी करून घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियनने नुकत्यास प्रसिध्द केलेल्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स (वजन आणि उंचीचे प्रमाण) 35 हून जास्त असल्यास आणि टाईप 2 मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असणार्या रुग्णांचा बीएमआय 30 हून जास्त असल्यास बेरियाट्रिक सर्जरी हा रामबाण उपाय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या :
अमेरिका आणि चीननंतर स्थूलतेच्या प्रमाणामध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. स्थूलतेवर मात करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरीला भारतीयांकडून पसंती दिली जात आहे. पुणे शहर मेडिकल हब म्हणून उदयास आल्याने परदेशातूनही अनेक रुग्ण स्थूलतेच्या शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पसंती देत आहेत. भारतात श्रीलंका, कॅनडा, आफि—का, बांगलादेश, श्रीलंका, युरोप अशा देशांमधून रुग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येतात. कुशल मनुष्यबळ, अद्ययावत तंत्रज्ञान आणि परवडणारा खर्च यामुळे बेरियाट्रिक सर्जरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले की मधुमेह,हृदयरोग, उच्च रक्तदाब, गुडघेदुखी यांसह वंध्यत्वासारख्या समस्या बळावतात. नैसर्गिक उपाय, व्यायाम, संतुलित आहार यांनी वजन कमी होत नसल्यास बेरियाट्रिक सर्जरीचा पर्याय उपयुक्त ठरतो.
जगभरात झालेल्या संशोधनानुसार, बेरियाट्रिक सर्जरी केलेल्या टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांचे आयुष्य सुखकर होते. लठ्ठ व्यक्ती शस्त्रक्रियेनंतर गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकतात. शस्त्रक्रियेनंतर व्हिटॅमिनची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे काही काळ व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शहा सांगतात, 'स्त्रीच्या शरीरात चरबी तयार होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शस्त्रक्रिया करून घेण्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण थोडे जास्त आहे. शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे तीन ते पाच लाख रुपये खर्च होतो. केंद्र शासनाने स्थूलता हा आजार ठरवल्यामुळे बेरियाट्रिक सर्जरीचा खर्च विम्यामध्ये कव्हर होतो. दुर्बिणीतून ऑपरेशन केले जात असल्यामुळे रुग्ण दोन-तीन दिवसांमध्ये घरी जाऊ शकतो आणि आठवड्यात दैनंदिन कामाला सुरुवात करू शकतो.'
शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यावी?
निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा असतो.
शस्त्रक्रियेनंतर सक्रिय जीवनशैली अंगिकारावी.
आहारात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असावे. सॅलड, कच्च्या भाज्यांचा समावेश असावा.
बेरियाट्रिक सर्जरीनंतर हार्मोन बदलल्यामुळे आहार संतुलित करणे सोपे जाते
बेरियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये मूळ कारणावर उपचार केले जातात. काही प्रकारांमध्ये जठराची, तर काही प्रकारांमध्ये जठर आणि आतड्याची शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. अतिरिक्त फॅट शोषून घेतले जात नाहीत. शस्त्रक्रिया केल्यामुळे कॅन्सर, अॅटॅक, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांचे आयुष्य सुखकर होते. कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावरही नियंत्रण मिळवता येते.
– डॉ. शशांक शहा, विश्वस्त आणि माजी अध्यक्ष, ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया